शहर स्वच्छतेचा तरुणाईचा संकल्प 

शहर स्वच्छतेचा तरुणाईचा संकल्प 

सांगली - स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छतेचा संकल्प महाविद्यालयीन तरुणाईने आज केला. महापालिकेच्या वसंतदादा सभागृहात या अभियानात तरुणांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने विविध महाविद्यालयातील युवक जमा झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियानाचे ऍप डाऊनलोड केले. पुढील पंधरा दिवस शहरातील सर्व 19 महाविद्यालयांमध्ये स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे. या मोहिमेत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, नगरसेवक, पत्रकारांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार असल्याची घोषणा महापौर हारुण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी केली. उपमहापौर विजय घाडगे, उपायुक्त सुनील पवार यावेळी उपस्थित होते. 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरे हागणदारीमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने व्यापक प्रसिद्धी आणि उपक्रम सुरू आहेत. आज विविध महाविद्यालयातील युवक-युवतींना महापालिकेत बोलवण्यात आले होते. यानिमित्ताने अनेकांनी आयुष्यात प्रथमच महापालिकेत पाऊल ठेवले. शहराचे प्रश्‍न ज्या खुर्च्यांवरून मांडले जातात तिथेच ही मंडळी विराजमान झाली होती. ऍप डाऊनलोड करण्याचे प्रात्यक्षित झाले. 

रॉयल्स स्टुडंट यूथ फौंडेशनचे टीम प्रमुख ऋषीकेश पाटील याने या उपक्रमात सर्व ताकदीनिशी सहभागी होऊ, अशी हमी दिली. सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्कचे विवेक पवार याने सर्व 19 महाविद्यालयांवर यिनचे सदस्य शहरात जागृती अभियान राबवतील, असे सांगितले. 

श्री. शेखर माने म्हणाले, ""ही महापालिका या तरुणांचीही आहे. त्यांच्याच सहभागाने ही मोहीम यशस्वी होऊ शकते. स्वच्छतेचा संकल्प स्वतःच्या घरापासून करुया.'' सुनील पवार म्हणाले, ""महापालिकेची यंत्रणा स्वच्छतेसाठी खूप काही करीत असते. मात्र शहराचा एकूण परिसर आणि मनुष्यबळ यात मोठी तफावत आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय ही मोहीम पुढे जाणार नाही. ही केवळ बक्षिसासाठी नाही तर स्वच्छता ही सवय बनावी, यासाठी प्रयत्न आहेत.'' नगरसेवक मृणाल पाटील, शिवराज बोळाज, विष्णू माने, सुरेखा कांबळे आदी उपस्थित होते. 

"यिन'चा सक्रिय सहभाग 
महापालिका क्षेत्रातील सर्व 19 महाविद्यालयांमध्ये आयुक्त, उपायुक्तांसह अधिकारी स्वच्छतेचा जागर करण्यासाठी सहभागी होणार आहेत. महापालिका आवारात आधी पथनाट्य होईल. घोषणा फलक लावले जातील. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी ऍप डाऊनलोड करावे, यासाठी प्रात्यक्षिक सादर केले जाईल. महापालिकेच्या या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महाविद्यालयांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. यिनच्या वतीने या सर्व महाविद्यालयांमध्ये उपक्रम होतील, असे समन्वयक विवेक पवार यांनी सांगितले. 

शहर लवकरच हागणदारीमुक्त 
महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग हागणदारीमुक्त होणार आहेत. वैयक्तिक शौचालयांसाठी अनुदान मागणीसाठी एकूण 4854 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 1400 अर्ज छाननीत बाद ठरले. 3259 प्रस्ताव मान्य करण्यात आले. सध्या 2167 शौचालये बांधून पूर्ण झाली असून 2381 शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. 2 कोटी 98 लाख रुपयांचे अनुदान वाटप झाले असून 1 कोटी 10 लाख रुपयांचे अनुदान अजूनही देय आहे. येत्या आठवडा भरात शहर हागणदारीमुक्त म्हणून जाहीर केले जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

"ऍप' डाऊनलोड करा 
महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी स्वच्छ भारत अभियानाचे ऍप डाऊनलोड करावे, असे आवाहन आज करण्यात आले. किती नागरिकांनी या ऍपचा वापर केला यावरही महापालिकेला गुण प्राप्त होणार आहेत. या ऍपवर स्वच्छता किंवा कचऱ्याचे फोटो टाकल्यास नागरिकांचा सहभाग स्पष्ट होणार आहे. तक्रार केल्यानंतर 12 तासांत त्याचा निपटारा केला तर महापालिकेचे गुण वाढणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com