बंद इमारतींच्या घरपट्टीत सवलत

Building
Building

कऱ्हाड - तीन महिने अथवा त्याहून अधिक कालावधीपर्यंत ग्रामीण भागातील बंद असणाऱ्या इमारतीला ग्रामपंचायतीकडून घरपट्टीत सवलत मिळवता येते. मात्र, कायद्यातील ही तरतूद अनेकांना माहितीही नाही. ग्रामपंचायतीकडे अर्ज करून ही सवलत मिळवण्याचा अधिकार असून, कायद्यातील ही तरतूद कागदोपत्री राहिल्याने इमारत मालकही त्यापासून अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. शहरात वास्तव्यास असणाऱ्या घरमालकांना गावाकडील घराच्या घरपट्टीत सवलत मिळणे शक्‍य होणार आहे.

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ आणि त्यातील कायदा कलम १२४ पोटकलम खंड एक अन्वये ग्रामपंचायती त्यांच्या कार्यक्षेत्रातील इमारतींना घरपट्टी आकारण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामध्ये निवासी, वाणिज्य, औद्योगिक वापरानुसार घरपट्टीची आकारणी केली जाते. घरपट्टी हे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. मात्र, ग्रामीण भागात काही घरे, इमारती वापराविना अनेक दिवस बंद असतात. त्यात सातत्याने तीन महिन्यांपासून अगदी वर्षभरापर्यंत काही इमारती, घरे बंद असतात. मात्र, त्याच्या मालकांना ग्रामपंचायतीकडे त्या मिळकतींचा वर्षाची घरपट्टी भरून भुर्दंड सोसावा लागतो. त्यावरही शासनाने उपाय दिला आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार नियम १८ मध्ये कर प्रथमतः कोणाकडून वसूल करायचा व नियम १९ अन्वये कराची सूट देणे किंवा कर परत करणे यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार ज्या इमारती किंवा घरे तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ बंद असल्यास अशा इमारतींच्या किंवा घरांच्या मालकांना घरपट्टीत सवलत मिळवता येते. अशा इमारती, घरांना किमान दराने घरपट्टीची आकारणी करता येते. ग्रामपंचायत ही क्षेत्रातील घर मालक, तसेच त्यांच्या घरातील इतर सदस्यांना सोयीसुविधा पुरवत असते.

मात्र, घर बंद असेल, तर अशा सोयी- सुविधा घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे अशी घरे घरपट्टी सवलत मिळण्यास पात्र ठरू शकतात. मात्र, घराच्या किंवा इमारतींच्या घरपट्टीत सवलत मिळण्यासाठी संबंधित मालकांना संबंधित सरपंच, ग्रामपंचायतीकडे नोटीस देणे आवश्‍यक आहे.

संबंधित नोटीस दिल्यानंतरच घरपट्टीत सवलत मिळू शकते अथवा त्या तारखेपासून रक्कम परत करता येते. दरम्यान, या तरतुदीमुळे शहरात वास्तव्यास असणाऱ्यांची गावाकडे बंद अवस्थेत असणाऱ्या इमारती, घरांच्या घरपट्टीत सवलत घेता येणे शक्‍य होणार आहे.

तर ग्रामपंचायातीच्या उत्पन्नावर परिणाम...
घरपट्टीतील सवलतीचा नियम ग्रामपंचायतीच्या दृष्टीने उत्पन्नात घट करण्याचा असल्यामुळे त्याबाबत ग्रामपंचायतींकडून कायम ‘चुप्पी’ पाळली जाते. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर मर्यादा असताना बंद घरांच्या घरपट्टीत सवलत दिल्यास ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळेच ही तरतूद केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com