हातांमध्ये दिसताहेत कापडी पिशव्या! 

परशुराम कोकणे
मंगळवार, 26 जून 2018

सोलापूर : प्लास्टिक कॅरीबॅगमुळे फार कचरा होतो, बरे झाले बंदी आली, बंदी केली खरी पण कागदी आणि कापडी पिशव्यांसोबतच अन्य पर्यायही यायला हवेत, कपड्यांची पॅकिंग प्लास्टिक पिशवीमध्येच येते आम्ही तर काय करणार? अशा संमिश्र प्रतिक्रिया प्लास्टिक बंदीनंतर बाजारपेठांमधून ऐकू येत आहेत. प्लास्टिक बंदीनंतर बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांच्या हातात कापडी, कागदी पिशव्या दिसून येत आहेत. पाणी आणि धुळीपासून मालाचे संरक्षण करण्यासाठी प्लास्टिकला चांगला पर्याय यायला हवे असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

सकाळ प्रतिनिधीने मंगळवार बाजारात फेरफटका मारून प्लास्टिक बंदीनंतरच्या स्थितीचा अंदाज घेतला. मासाला, मासे, झिंगे, बोंबील, अंडी, फळे कागदामध्ये गुंडाळून देण्यात येत आहेत. बहुतांश विक्रेत्यांनी रद्दी पेपरमध्ये माल ठेवून त्यावर दोरा गुंडाळून देण्याची कल्पना स्वीकारल्याचे दिसून आले. कोणाकडेही माल देण्यासाठी प्लास्टिक कॅरिबॅग दिसून आली नाही, पण कपडे, भांडी प्लास्टिक पिशव्यांमध्ये असल्याचे दिसून आले. जोवर आम्हाला पर्याय मिळणार नाही तोवर कपड्यावरील, भांड्यावरील प्लास्टिक काढणे शक्‍य नाही असे विक्रेत्यांनी सांगितले. कारवाई करण्यासाठी अद्याप तरी महापालिकेचे पथक आमच्याकडे आले नाही असेही काही विक्रेत्यांनी सांगितले. 

प्लास्टिक बंद झाल्याने मी कागदापासून पिशवी बनवून ग्राहकांना माल देतोय. प्लास्टिक कॅरीबॅगमुळे खूप कचरा व्हायचा. बंदीमुळे नक्‍कीच फरक पडेल. ग्राहकांनी बाजारात येताना घरून कापडी पिशवी आणायची सवय लावून घ्यावी 
- अरबाज कल्याणी, विक्रेता 

प्लास्टिक पिशवी वापरण्यावर बंदी आणल्याने बाजारात येताना घरून कापडी पिशवी आणली आहे. शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. प्लास्टिक बंदी केल्याने सकारात्मक बदल दिसून येतील, सर्वांनी याचे स्वागत करायला हवे. 
- मधुमती कोळकुर, ग्राहक 

कपडे कंपनीकडून प्लास्टिक पिशव्यांमध्येच येतात, त्यामुळे अजूनतरी आम्हाला पर्याय मिळाला नाही. सर्व कपडे प्लास्टिकशिवाय ठेवणे अवघड आहे. पाऊसामुळे किंवा धुळीमुळे कपडे खराब होऊ शकतात. अद्याप तरी महापालिकेचे पथक आमच्यापर्यंत आले नाही. 
- मल्लिनाथ म्हेत्रे, विक्रेता

प्लास्टिक कॅरिबॅग वापरणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड होणार असल्याचे कळाले. आज बाजारात येताना घरून कापडी पिशव्या सोबत आणल्या. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. हळूहळू प्लास्टिकला पर्याय येतील आणि अडचणी दूर होतील. 
- दत्तात्रय पंचार्या, ग्राहक

Web Title: cloth bags in hands