#PlasticBan जुने कपडे द्या, 5 रुपयात शिवून मिळेल पिशवी! 

परशुराम कोकणे
गुरुवार, 28 जून 2018

लोकांकडून जुने कपडे घेऊन त्यापासून पाच रुपयात पिशवी शिवून देण्याचा उपक्रम सोलापुरात डॉन्की सेंच्युरी ऑफ इंडियाने सुरु केला आहे.

सोलापूर - प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी आल्याने कापडी पिशव्यांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. कापडी पिशव्या शिवून देणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. लोकांकडून जुने कपडे घेऊन त्यापासून पाच रुपयात पिशवी शिवून देण्याचा उपक्रम सोलापुरात डॉन्की सेंच्युरी ऑफ इंडियाने सुरु केला आहे. यामुळे गाढव राखणाऱ्या कुटुंबियांना पर्यायी रोजगार मिळाला आहे. 

सोलापुरात गाढवं राखणाऱ्या कुटुंबाची संख्या जवळपास दीड हजार आहे. पावसाळ्याच्या कालावधीत शहर आणि परिसरातील वीट भट्ट्या बंद असतात. या काळात गाढवं राखणाऱ्या कुटुंबातील सदस्य बांधकामावर कामाला जातात. कुटुंबातील महिलांच्या हाताला कामाची गरज भासते. ही गरज ओळखून डॉन्की सेंच्युरी ऑफ इंडियाच्या सदस्यांनी महिलांना कापड शिवण्याचे प्रशिक्षण दिले. गेल्या काही दिवसांपासून लोकांकडून जुन्या कपड्यांचे संकलन करून पिशव्या शिवून दिल्या जात आहेत. एक कापडी पिशवी शिवून देण्यासाठी पाच रुपये घेतले जात आहेत. 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉन्की सेंच्युरी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी सुत्रिता गडद, आयुब शेख, डॉ. सत्यजित पाटील, रामू वाघमारे, हणमंतू म्हेत्रे आदी प्रयत्नशील आहे. गाढवं राखणाऱ्या कुटुंबातील या महिलांना शासनाकडून शिवण मशिन मिळावेत, अशी मागणी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. 

गाढव राखणाऱ्या अनेक कुटूंबीयांमधील महिलांनी कापडी पिशव्या बनवायला सुरवात केली आहे. सोलापूरकरांनी त्यांचे जुने कपडे आमच्याकडे द्यायचे, आम्ही त्यांना पाच रुपयात पिशवी शिवून देवून. प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर कापडी पिशव्यांची मागणी वाढली आहे. अशाप्रकारचा हा उपक्रम डॉन्की सेंच्युरी ऑफ इंडियाकडून पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. 
- सुचित्रा गडद, प्रतिनिधी, डॉन्की सेंच्युरी ऑफ इंडिया
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: clothes bags for five rupees