राहुरीत आभाळच फाटले

विलास कुलकर्णी
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

केदारेश्वर मंदिराजवळील (म्हैसगाव) म्हैस ओढ्याने रौद्र रूप धारण केले होते. ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे म्हैसगाव ते राहुरी रस्ता बंद झाल्याने पाच गावांचा राहुरी तालुक्‍याशी संपर्क तुटला.

राहुरी (ता. नगर) : तालुक्‍याच्या पश्‍चिमेकडील दुर्गम, डोंगराळ म्हैसगाव परिसरात सोमवारी (ता.4) सकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. तब्बल साडेचार तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना प्रचंड पूर आला होता. तुडुंब भरलेले बंधारे फुटले. उभ्या पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे मुळा धरणातून दोन हजार क्‍यूसेकने विसर्ग वाढविण्यात आला आहे.

केदारेश्वर मंदिराजवळील (म्हैसगाव) म्हैस ओढ्याने रौद्र रूप धारण केले होते. ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे म्हैसगाव ते राहुरी रस्ता बंद झाल्याने पाच गावांचा राहुरी तालुक्‍याशी संपर्क तुटला. पावसामुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा शेरी, चिखलठाण भागात अडकली आहे.

शेरी येथील तलाव फुटण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तलावाच्या सांडव्याचा भाग मोठा करून, तलावातील पाणी कमी करण्यास स्थानिक तरुणांना सांगितले आहे. एकूणच या भागात सर्वत्र पाणी भरलेले आहे. सगळे चित्रच भयावह आहे. पाणी ओसरल्याशिवाय या भागातून बाहेर पडणे कठीण असल्याचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी सांगितले.

पाच गावांचा संपर्क तुटला
सोमवारी पहाटे चार ते सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने म्हसैगाव परिसराला अक्षरक्ष: झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सकाळी साडेअकरा वाजता केदारेश्वर मंदिराजवळील (म्हैसगाव) ओढ्याच्या पुलावरून प्रचंड वेगाने पाणी वाहू लागल्याने म्हैसगाव ते राहुरी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. त्यामुळे शेरी, चिखलठाण, म्हैसगाव, कोळेवाडी, बुळे पठार भागातील ग्रामस्थांचा राहुरी तालुक्‍याशी संपर्क तुटला.

अधिकारी अडकले
अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी व पंचनामा करण्यासाठी या भागात गेलेले तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, सहायक गटविकास अधिकारी अनंत परदेशी, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, मंडलाधिकारी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, असे सर्वच अधिकारी सकाळपासून पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले आहेत.

परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सकाळी साडेदहा वाजता सर्व शासकीय यंत्रणेसह या भागात आलो होतो. सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हैसगाव ते शेरीदरम्यान अडीच तास सर्वच अडकलो होतो. रस्त्यावरील पाणी कमी झाल्यानंतर शेरी येथे पोचलो. शेरी, चिखलठाण भागातील काही बंधारे फुटले आहेत. बुळे पठार ते शेरी रस्ता बंद पडला आहे. उभ्या पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. जमिनींनाच नदीचे स्वरूप आले आहे. शेतात 20-25 चौरस फूट खोल खड्डे पडले आहेत. आज दुपारी तीन वाजता जिरेदरा, कुरुंदरा या अतिदुर्गम भागात आलो आहोत.
- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cloud burst in rahuri