पोलिसांना मोफत आरोग्यसेवा आणि घर : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

'महाराष्ट्रातील हा सर्वांत उंच झेंडा मी हेलिकॉप्टरमधून थेट पोलवर उतरून फडकाविला असता; मात्र माझी ही संधी हुकली', अशी मिश्‍किल टिप्पणी अक्षयकुमारने केली. त्यावर 'आपण आणखी एक झेंडा उभारणार असून त्याचे लोकार्पण तुमच्या हस्तेच आणि अशा प्रकारे करूया', असा प्रतिसादही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

कोल्हापूर : पोलिस दलातील प्रत्येकाला व त्यांच्या कुटुंबीयांनादेखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत आरोग्यसेवा देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) जाहीर केले. तसेच, सध्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांबरोबरच निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांनाही ही योजना लागू असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर येथील पोलिस मैदानावरील सर्वांत उंच 303 फूट उंचीच्या ध्वज स्तंभाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली. '13 हजार पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्‍न मार्गी लावत असून ही घरे लवकरच पोलिसांना उपलब्ध करून दिली जातील', असेही फडणवीस यांनी सांगितले. या कार्यक्रमास अभिनेता अक्षयकुमारही उपस्थित होता. त्याने मराठीत संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. 

'महाराष्ट्रातील हा सर्वांत उंच झेंडा मी हेलिकॉप्टरमधून थेट पोलवर उतरून फडकाविला असता; मात्र माझी ही संधी हुकली', अशी मिश्‍किल टिप्पणी अक्षयकुमारने केली. त्यावर 'आपण आणखी एक झेंडा उभारणार असून त्याचे लोकार्पण तुमच्या हस्तेच आणि अशा प्रकारे करूया', असा प्रतिसादही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. 

'कोल्हापूर हे पर्यटनाचे केंद्र असून येथे आठ हजार फुलपाखरांचे उद्यान बनविणार आहे', असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी मंचावर सर्वपक्षीय आमदार, खासदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: CM Devendra Fadnavis announces home scheme for Maharashtra Police