मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यात होणार मोठा राजकीय भूकंप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा राज्यात निघाली आहे. ता. 29 ऑगस्ट रोजी यात्रेचे सांगलीत आगमन होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी आज राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगलीत बैठक घेतली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते.

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ता. 29 ऑगस्ट रोजी सांगलीत येणार असून त्यावेळी जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केला. तर चार ते पाच मोठे नेते प्रवेश करणार असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा राज्यात निघाली आहे. ता. 29 ऑगस्ट रोजी यात्रेचे सांगलीत आगमन होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी आज राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगलीत बैठक घेतली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री भेगडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ता. 29 रोजी सकाळी 10 वाजता सांगली जिल्ह्यात येणार आहे. कासेगाव (ता. वाळवा) येथे यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येईल. ताकारी, पलूस, तासगाव, मणेराजूरी, कवठेमहांकाळ, भोसे, कळंबी, मिरज, सांगली, इनामधामणी असा शंभर किलोमीटरचा प्रवास होणार आहे. यामध्ये रोड शो, जाहीर सभा होणार आहेत. यात पलूसला सकाळी 11 वाजता, तासगावमध्ये दुपारी 12 वाजता, तर सांगलीत सायंकाळी 4 वाजता सभा होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा राज्यातील 32 जिल्ह्यात 175 हून अधिक मतदार संघात जाणार आहे. राज्याच्या भविष्याला दिशा देणारी ही यात्रा असेल असे मंत्री भेगडे म्हणाले. यात्रेचा समारोप ता. 1 सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणार आहे.

जिल्हाध्यक्षांना भरतीचे अधिकार ते म्हणाले, भाजपने भरती बंद केली असली तरी जिल्हास्तरावर जिल्हाध्यक्षांना अधिकार दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेत जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होईल.' पण, कुणाचे प्रवेश होणार यावर त्याच वेळी कळेल असे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी प्रत्येक सभेत प्रवेश होतील. चार ते पाच चांगले मोठे नेते प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील आठही मतदार संघात विजय मिळवू. ज्या मतदार संघात यापुर्वी विजय मिळाला नाही, त्या मतदार संघात महाजनादेश यात्रा जाणार आहे.' मात्र शिवसेनेने जिल्ह्यातील निम्म्या जागावर दावा सांगितल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, पक्ष ठरवेल त्या जागा घेणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis maha janadesh yatra in Sangli