मातीशी संबंधच नसल्याने मुख्यमंत्र्यांना पावसाचा अनुभव कमी : खासदार श्रीनिवास पाटील

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 October 2019

उदयनराजेंचे नेतृत्व आणखी बराच काळ चालेल. त्यासाठी त्यांनी लोकांत जाऊन कमी झालेला विश्‍वास परत मिळवावा, असेही खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट केले. 

पुणे / सातारा : पेरणीपूर्वी येणाऱ्या पावसाचा आनंद वेगळाच असतो. पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्या लोकांनाच होतो. त्यामुळे पावसाचा आनंद जसा शेतकऱ्यांना झाला, तसा तो मुख्यमंत्र्यांना झाला नसावा. ते शेतकरी आहेत की नाही, याची मला कल्पना नाही, असा टोला खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. दरम्यान, उदयनराजेंचे नेतृत्व आणखी बराच काळ चालेल. त्यासाठी त्यांनी लोकांत जाऊन कमी झालेला विश्‍वास परत मिळवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांची साताऱ्यात भरपावसात झालेली सभा चांगलीच गाजली होती. सभेनंतर सर्वत्र शरद पवारांचीच चर्चा सुरू होती. त्याचा परिणाम मतदानावरही झालेला दिसून आला. मुख्यमंत्र्यांनी "वर्षा' निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना "पावसात भिजावे लागते, हा अनुभव कमी पडला', अशी खोचक टिप्पणी केली होती. पुण्यात पत्रकारांशी बोलताना श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्याच शैलीत मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर दिले. श्री. पाटील म्हणाले, ""पेरणीपूर्वी येणाऱ्या पावसाचा आनंद वेगळाच असतो. पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्या लोकांनाच होतो. त्यामुळे पावसाचा आनंद जसा शेतकऱ्यांना झाला, तसा तो मुख्यमंत्र्यांना झाला नसावा. ते शेतकरी आहेत की नाही, याची मला कल्पना नाही.''

सातारा लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले, ""विकासकामांसाठी आपण पक्षांतर करत असल्याचे उदयनराजेंनी सांगितले होते. परंतु, हे कारण सबळ नव्हते. सर्वसामान्य जनतेने तीन वेळा निवडून देऊनही त्यांच्या हाताला काम नव्हते. याचाच राग लोकांच्या मनात होता. त्यामुळे पर्यायी उमेदवार मिळाल्यास त्याला आपण मत द्यावं, अशी ऊर्मी तरुणांच्या आणि अनुभवी लोकांच्या मनात होती. त्यामुळे मी बहुमताने विजयी झालो.'' 

उदयनराजेंनी लोकांत जाऊन विश्‍वास मिळवावा 

उदयनराजेंनी आता तरुणांना हाताशी धरून मोठे कारखाने आणून रोजगार दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या धान्याला भाव मिळवून दिला पाहिजे. तसेच पुन्हा नव्याने चळवळ सुरू केली तर त्यांचे नेतृत्व आणखी बराच काळ चालेल. त्यांनी लोकांमध्ये जावे, त्यांचा विश्‍वास परत मिळवावा. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहून त्यांनी काम केले असते तर त्यांना याहीपेक्षा मोठी संधी मिळाली असती. संधीच्या शोधात पक्षांतर करणं हे कदाचित लोकांना आवडलं नाही, असेही श्री. पाटील यांनी नमूद केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM does not have affiliation with soil says MP Srinivas Patil