मुख्यमंत्र्यांना सांगलीची माहिती कमीच - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. जाहीर सभा रद्द करून मुंबईतून व्हिडिओ क्‍लिपद्वारे मतदानाचे आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या भाषणातील अनेक मुद्यांवर त्यांनी आक्षेप घेतला.

सांगली : मुख्यमंत्र्याना सांगलीची माहिती कमीच दिसते अशी टिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. जाहीर सभा रद्द करून मुंबईतून व्हिडिओ क्‍लिपद्वारे मतदानाचे आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या भाषणातील अनेक मुद्यांवर त्यांनी आक्षेप घेतला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार प्रकाश शेंडगे, इलियास नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, श्रीनिवास पाटील, सुरेश पाटील, महिला शहराध्यक्षा विनया पाठक आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले, "राज्य सरकारने वारेमाप घोषणा केल्या. मात्र त्यांची पुर्तता केली नाही. त्यामुळे त्यांना फिरणे अवघड झाले आहे. म्हणूनच ते सांगलीला आले नसावेत. त्यांची व्हिडिओ क्‍लीप पाहिली. त्यातून त्यांना सांगलीच्या प्रश्‍नांची माहिती नसल्याचे दिसते. त्यांना माहिती देणाऱ्यांनी त्यांची दिशाभूल केली असावी. गेल्या साडेतीन वर्षात ते इकडे फिरकले नाहीत. ते आमच्या महापालिकेचा का द्वेष करीत आहेत हेच समजत नाहीत.'' 

भाजप पोलिस आणि प्रशासनाच्या बळाचा वापर करीत असल्याचा आरोप करुन ते म्हणाले, "मिरजेतील ख्रिश्‍चन समाजाचे पास्टर रवी सोनी यांनी समाजाची बैठक घेतली होती. तेथे जाऊन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. पुरावा असेल तर अटक करा पण असा त्रास कशासाठी? आमच्या एका उमेदवाराच्या पतीस हद्दपारीची नोटीस बजावली होती. त्यावर न्यायालयाने ताशेरे मारुन ती रद्द केली आहे. ही सारी लक्षणे पायाखालची वाळू घसरत असल्याची आहेत.'' 
 

Web Title: CMs knowledge about Sangli is less says jayant patil