महाविद्यालयीन निवडणुकांवर आचारसंहितेचे सावट 

Code of conduct on college elections
Code of conduct on college elections

सोलापूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे महाविद्यालयीन निवडणुकांचा अध्यादेश राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मंगळवारी जारी केला. त्यानुसार उमेदवारांना कोणत्याही सामाजिक संस्थेचे बोधचिन्ह अथवा राजकीय पक्षांचे चिन्ह वापरता येणार नाही. परंतु, या निवडणुकांवर लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे सावट असणार आहे. 

मागील काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील महाविद्यालयांमध्ये पुन्हा खुल्या मतदानातून निवडणुकांचे वारे वाहणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अध्यादेशानुसार विद्यापीठाने दरवर्षी 30 सप्टेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यंदा ही मुदत निघून गेली असल्याने यावर्षीच्या निवडणुकांबाबत स्पष्टता नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी नव्या सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची घोषणा केली असून त्यादृष्टीने नियोजनही करण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

अध्यादेशातील ठळक मुद्दे... 
- दरवर्षी विद्यापीठाने 30 सप्टेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी 
- उमेदवाराला राजकीय पक्ष अथवा समाजिक संस्थांचे चिन्ह, बोधचिन्ह वापरता येणार नाही 
- निवडणूक मेळावे अथवा उमेदवाराला मिरवणूक काढता येणार नाही 
- परीक्षा प्रक्रियेत किंवा अन्य अपराधासाठी दोषी ठरविलेला विद्यार्थी निवडणुकीसाठी अपात्र 
- उमेदवारांना स्वतंत्र पॅनल तयार करण्यावर बंदी 

मागील तीन-चार वर्षांपासून या सरकारने महाविद्यालयीन निवडणुकाच घेतल्या नाहीत. आता लोकसभा व विधानसभेच्या तोंडावर विद्यार्थ्यांची सहानुभूती मिळविण्याच्या उद्देशाने निवडणुका घेण्याचा अध्यादेश सरकारने काढला आहे. विद्यार्थ्यांच्या निवडणुकांसाठी एवढ्या जाचक अटींची गरज नसून त्या रद्द करण्यात याव्यात. 
- गणेश डोंगरे, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस विद्यार्थी संघटना 

लोकशाही पद्धतीने पार पडणाऱ्या निवडणुकांसाठी विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे अटी घातल्या आहेत. त्यामुळे लोकशाही पद्धतीने नव्हे तर हुकूमशाही पद्धतीने निवडणुका होण्याची शक्‍यता असून सरकारने घातलेल्या अटींचा पुनर्विचार व्हावा. 
- लहू गायकवाड, जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी सेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com