सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीत "आरटीओ'चे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

सातारा - सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी शाळांमधील समित्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला जाईल. त्याचबरोबर विद्यार्थी वाहतूक नियमानुसार होण्यासाठी शाळा सुरू झाल्यानंतर स्कूल बसची विशेष तपासणी मोहीम राबविणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले. 

सातारा - सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी शाळांमधील समित्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला जाईल. त्याचबरोबर विद्यार्थी वाहतूक नियमानुसार होण्यासाठी शाळा सुरू झाल्यानंतर स्कूल बसची विशेष तपासणी मोहीम राबविणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले. 

"कॉफी वुईथ सकाळ' या उपक्रमांतर्गत "सकाळ' कार्यालयात संपादकीय विभागाशी चर्चा करताना श्री. धायगुडे बोलत होते. येत्या काही दिवसांमध्ये शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग काय उपाययोजना करणार, यावर बोलताना श्री. धायगुडे म्हणाले, ""कऱ्हाड-पाटण वगळता जिल्ह्यात 552 स्कूल बसची नोंदणी झाली आहे. त्यातील शाळांच्या नावावर 225 तर, शाळा व खासगी वाहतूकदार यांच्यामध्ये करार असलेल्या अशा 327 स्कूल बस आहेत. शासनाच्या निर्देशानुसार गेले दोन वर्षे शाळा सुरू होण्यापूर्वी या सर्व स्कूल बसचा फिटनेस तपासण्यात आला होता. यंदा शासनाचे निर्देश आले नाहीत. तरीही स्कूल बसचालकांच्या विनंतीनुसार दोन स्वतंत्र शिबिरांचे आयोजन करून तपासणी करून घेण्यात आली आहे. उरलेल्या स्कूल बसची तपासणी सुरू आहे. 

पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय स्कूल बस समिती कार्य करते. तिची बैठक शाळा सुरू होण्यापूर्वी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या समितीमध्ये विद्यार्थी वाहतूक सुरक्षितपणे आणि नियमानुसार होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजनांची चर्चा करण्यात येणार आहे. सातारा शहरामध्ये सुरू असलेल्या कामामुळे होणारी सध्याची वाहतूक कोंडी पाहता शाळांच्या सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येईल. त्यानुसार विविध विभागांच्या समन्वयाने शाळास्तरावरील स्कूल बस समित्या सक्षम करण्याकडे या वर्षी प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. सध्या कार्यक्षेत्रातील 252 शाळा समित्यांची नोंदणी झाली आहे. ती सर्व शाळांत कार्यान्वित करण्यात येणार आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांशी शाळेचा दररराजेचा संबंध असतो. त्यामुळे त्या माध्यमातून अधिक लक्ष देण्यावर भर राहील. त्याचबरोबर विद्यार्थी वाहतुकीवर नियंत्रण राहण्यासाठी शाळा सुरू झाल्यानंतर विशेष तपासणी मोहीम राबविणार असल्याचेही ते म्हणाले. 

संजय धायगुडे म्हणाले...  
-रिक्षाचालकाने जादा भाडे मागितल्यास तक्रार करा. नाव गोपनीय ठेवले जाईल 
-रिक्षा थांब्यांचा लवकरच सर्व्हे करणार 
-उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कामे ऑनलाइन सुरू 
-नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थाशिवाय कामे करावीत. अडचण आल्यास संपर्क साधा 
-ब्रेक टेस्टसाठी वर्ये येथील जागा लवकरच मिळेल. तीन-चार महिन्यांत तेथे तपासणीचे काम सुरू होईल 
-वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतील 

Web Title: Coffee with sakal Deputy Regional Transport Officer Sanjay Dhayegude