आंबा पर्यटन बहरतेय, सुविधाही पुरवाव्यात

आंबा पर्यटन बहरतेय, सुविधाही पुरवाव्यात

बहुरंगी, बहुढंगी निसर्गसंपन्नतेने नटलेल्या पश्‍चिम घाटमाथ्यावरील शाहूवाडी तालुक्‍यातील आंबा गाव. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्राचा मध्यबिंदू ठरणाऱ्या ठिकाणी देशभरातील पर्यटक येतात, विसावा घेत पर्यटनाचा आनंद निवांतपणे घेतात. या मुक्कामात आंब्यात दडलेल्या निसर्गसंपन्नतेच्या छटा अनुभवतात. मंदिरे, दर्ग्यापासून ते वन्यजीवांचे ऐतिहासिक महत्त्व नजरेत साठवतात. शिवाय येथील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेत समाधानाने मार्गस्थ होतात. मात्र, अशा पर्यटकांची संख्या व मुक्काम आणखी वाढावा, यासाठी या परिसरातील रिसॉर्ट चालक पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सज्ज आहेत. आवश्‍यकता आहे, ती येथील पर्यटन सुविधा सक्षम करण्याची, त्याची माहिती सर्वदूर पोहचविण्याची आणि त्यासाठी सरकारी यंत्रणांनी सजगता दाखविण्याची, असा सूर ‘सकाळ’मध्ये झालेल्या रिसॉर्ट चालकांच्या ‘कॉफी वुईथ सकाळ’मध्ये व्यक्त झाला.     

परिपूर्ण पर्यटनस्थळ
आंबा हे परिपूर्ण पर्यटनस्थळ आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लढाई पावनखिंडीत झाली. जगातील सर्वात मोठा ‘पतंग’ (कीटक) वर्षातून तीन वेळा आंब्यात पाहायला मिळतो. ‘गारंबीचा वेल’ सर्वात मोठा असतो. त्याची शेंग साडेपाच फूट उंचीची येथे आढळते, गेळा हा प्राणी हरीण वर्गात आहे. त्याची एक-दीड फूट उंचीचे लहान हरण या भागात आहेत. मलबार पिटरवायपर हा सर्प पावसाळ्यात मध्यरात्री, इथल्याच घनदाट जंगलात दिसतो. त्याचे चार रंग येथे दिसतात. गवा हा रेडा नव्हे, तर तो जंगली बैल आहे. त्याचा वावर येथील जंगली भागात आहे, सधन बडवी हे सर्वात मोठे फुलपाखरू व सर्वात लहान फुलपाखरू या परिसरात दिसते. याशिवाय शेखरू प्राणी, हरेल, जारूल, निळीशंखी अशी फुले येथे पहायला मिळतात. ही वैशिष्ट्ये जाणण्यासाठी पर्यटकांना येथे थांबावे लागेल.
- प्रमोद माळी
(वसुंधरा इको)

बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न गरजेचे
कोल्हापूर ते आंबा अशी खास पर्यटन बससेवा सुरू व्हावी. येथे व्ही. टी. पाटील फाऊंडेशनतर्फे पर्यटन मार्गदर्शक (गाईड) तयार करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यातूनच मीही गाईड म्हणून तयार झालो; पण गाईडची एकूण संख्या कमी असल्याने पर्यटकांना आंबा बारकाईने समजावून घेता येत नाही. आंबा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. दर महिन्याला येथे निसर्गात मोठे बदल होतात. त्यामुळे बारमाही पर्यटनासाठी आंबा पर्यटकांना खुणावतो. आकाश निरीक्षणासाठी आंबा ठिकाण अतिशय योग्य आहे. करवंदाची चटणी सारखे स्थानिक पदार्थ काही बचतगटांनी तयार केले आहेत. त्याला बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. 
- अजिंक्‍य बेर्डे
(मनोरम फौंडेशन)

जंगल सफारी अधिक चांगली व्हावी
छोट्या छोट्या रिसॉर्ट चालकांना जगासमोर येण्यासाठी संधी मिळाली पाहिजे. कारण या रिसॉर्टवरच आंबा परिसराचे पर्यटन अवलंबून आहे. आता जी जंगल सफारी आहे, ती अधिक चांगल्या पद्धतीने होणे आवश्‍यक आहे. आंब्यात पर्यटकांसाठी एका वॉटर पार्कची आवश्‍यकता आहे. तसेच पर्यटकांना पाहण्यासाठी पॉईंट विकसित केले पाहिजेत. 
- अनिल वायकूळ
(माजी सरपंच, आंबा)

दिशादर्शक फलक हवेत
आंब्यात अनेक गैरसोयी आहेत. रस्त्यांना दिशादर्शक फलक लावल्यास अनेक पर्यटनस्थळापर्यंत पर्यटकांना जाता येईल. पावनखिंडीकडे जाणारा रस्ता कच्चा आहे. तो सक्षम करावा लागेल. एसटीची कॅन्टीन सुविधा चांगल्या दर्जाची करावी लागेल. स्थानिक कलावंत व खाद्य संस्कृती यांचा मेळ घेणारा पर्यटन महोत्सव व्हावा. मानोली सड्याचे ऐतिहासिक महत्त्व पर्यटकांपर्यंत पोहचवावे लागेल. धोपेश्‍वर ते वाघझरा हा रस्ताही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. धरणाच्या पाणलोटाशेजारी उद्यान करता येणे शक्‍य आहे. तेथे वॉटर स्पोर्टस्‌ची सुविधा केली तर पर्यटकांना आनंद घेता येणे शक्‍य होईल. याच परिसरातील धबधबा ७० टक्के तुटला आहे, तिथे संरक्षक कठडा व पूरक सुविधा कराव्यात.
- सदाशिव पाटील
(सह्याद्री व्हॅली रिसॉर्ट) 

तळ्यांची दुरवस्था 
जंगली भागातील पाण्याच्या तळ्यांची दुरवस्था झाली आहे. वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी नाही की गवत नाही. वनविभागाने केलेल्या या सर्व पॉईंटची दुरवस्था झाली आहे. निसर्ग माहिती केंद्र इतर इमारतींआड दडले आहे. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. गवे पाहायला मिळेल अशी अपेक्षा ठेवून अनेक पर्यटक येतात. दिवस-रात्र विशाळगड मार्गावर इतकी वर्दळ असते की, या वर्दळीमुळे गवे येत नाहीत. त्यामुळे सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेसाठी रस्ता वर्दळीसाठी बंद केल्यास पुन्हा गवे मोठ्या संख्येने दिसू शकतील.  
- अभिजित पाटील
(मनाली रिसॉर्ट)

एटीएम सेवा गरजेची
सर्व प्रकारची जैवविविधता आंबा परिसरात पाहायला मिळते. पर्यटक येतात; पण आंब्यात एटीएमची सोय नाही. पर्यटकांच्या दृष्टीने एटीएम सेवा महत्त्वाची आहे. त्यामुळे बॅंकांनी येथे एटीएम केंद्र सुरू करायला हवे. आंब्याच्या जैवविविधतेबद्दल आम्ही रिसॉर्ट चालक खूप जागरूक आहोत. त्यामुळे आम्ही श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबविली. आंबा म्हणजे केवळ मुख्य रस्ता नाही. त्यामुळे आजूबाजूच्या छोट्या वाड्यावस्तीत जाणारे रस्तेही चांगल्या दर्जाचे हवेत. जेणेकरून पर्यटकांना ग्रामीण जीवन अनुभवणे सोपे होईल. 
- अजित सानप
(चैतन्य हिल रिसॉर्ट)

अनावश्‍यक निर्बंध नकोत
पर्यटकांना रात्रीचे जंगल अनुभवता यावे, यासाठी नाईट सफारी पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. पर्यटक आंबा येथे येण्यासाठी जे मुख्य कारण आहे, त्यात जंगलाचा वाटा मोठा आहे. अनेक पर्यटकांना दिवस मावळल्यानंतरचे जंगल अनुभवायचे असते; पण वन खाते त्यावर निर्बंध आणते. याउलट विशाळगडाकडे कर्कश हॉर्न वाजवत रात्रभर गाड्यांची ये-जा असते. पर्यटनवाढीसाठी जंगल निरीक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे पर्यटकांवर अनावश्‍यक निर्बंध नसावेत. याशिवाय एक कॉमन वॉटर पार्कही गरजेचा आहे. 
- सरदार वरेकर
(साई श्रद्धा रिसॉर्ट)

विशाळगडही विकसित व्हावा
स्वतःच्या घराचे रूपांतर एका सुंदर रिसॉर्टमध्ये केले आहे. आंबा पर्यटनवाढीसाठी जे प्रयत्न होतात, त्यामध्ये सक्रिय सहभाग असतो. जैवविविधता हे आंब्याचे वैशिष्ट्य आहे. ती टिकविण्यासाठी प्रयत्न आवश्‍यक आहेत. पीएचडीचा अभ्यास करणारे विद्यार्थी व इतरांनाही आंबा नेहमीच खुणावतो. अभ्यासाला येणारे विद्यार्थी आनंदित होऊन जातात. जळगाव, नागपूर येथूनही विद्यार्थी येथे अभ्यासाला येतात. ही खूपच आनंददायी गोष्ट आहे. आंबा पर्यटनस्थळासोबतच विशाळगड पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हायला हवा. ऐतिहासिक स्थळे व मंदिरांचे संवर्धन व्हावे. आंब्यामध्ये युको पॉईंट आहे. त्याचाही विकास महत्त्वाचा आहे.
- संतोष बागम
(गारवा हिल रिसॉर्ट)

निसर्गपूरक वाहनांची व्यवस्था हवी

आंबा परिसर दुर्गम आहे; पण निसर्गसौंदर्याने व्यापलेला आहे. अनेक वेळा या परिसरातील विद्युतपुरवठा खंडित होतो. त्याचा रिसॉर्ट व्यावसायिकांवर परिणाम होतो. त्यामुळे २४ तास विद्युतपुरवठा असावा. याशिवाय जंगल सफारीसाठी निसर्गपूरक वाहनांची व्यवस्था असावी. एक सार्वजनिक उद्यान ग्रामपंचायतीने तयार करावे. 
- माणिक पाटील
(गोकुळ रिसॉर्ट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com