'कॉफी विथ सकाळ'मध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवर महिलांचा सहभाग 

परशुराम कोकणे
रविवार, 22 एप्रिल 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने 'कॉफी विथ सकाळ'उपक्रमात महिलांनी सहभाग नोंदविला.

सोलापूर - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समतेने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. बाबासाहेबांसह सर्वच राष्ट्रपुरुषांना जाती-धर्माच्या, गटा-तटाच्या चौकटीत बांधता येणार नाही. बाबासाहेबांनी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी काम केले आहे. जयंती उत्सव साजरा करताना डॉल्बी किंवा अन्य खर्चिक बाबी टाळून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करणे, समाजप्रबोधनासाठी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न व्हायला हवा असे मत विविध क्षेत्रांतील मान्यवर महिलांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने 'कॉफी विथ सकाळ'उपक्रमात महिलांनी सहभाग नोंदविला. सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी सर्वांचे स्वागत केले. बाबासाहेबांचे विचार, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश, शिक्षण, कायदा, हक्क, पर्यावरण संवर्धन यासह विविध विषयांवर या वेळी चर्चा झाली. 

माझा समाज झोपला आहे, म्हणून मी जागा आहे हे बाबासाहेबांनी सांगितले होते. प्रत्येकाने संविधानाचे वाचन करून स्वत:चे हक्क समजून घ्यावेत. सर्व गोष्टींपासून वंचित असणाऱ्यांना बाबासाहेबांनी आरक्षण दिले. खासगीकरणामुळे समाजातील अनेक घटक शिक्षणापासून आजही वंचित आहेत. आपला तरुण आजही घरच्यांना मदत करत नाहीत. विज्ञानाची मदत घेऊन आपली सांस्कृतिक जपली पाहिजे. बाबासाहेबांच्या जयंतीला सर्वच समाजांनी एकत्र आले पाहिजे. - प्रा. आशा रोकडे-कीर्तिकर 

बाबासाहेबांनी संविधान लिहून समानतेचे कायदे आणले. तरी आजही अनेक महिला मानसिक गुलामगिरीत आहेत. कायदा राबविताना समोरचा व्यक्ती कोणत्या धर्माचा, कोणत्या जातीचा आहे हे आम्ही पाहत नाही. पण अनेकदा कायदा राबविताना अडचणी येतात. महिलांसह सर्वांनीच कायद्याचा वापर ढालीसारखा करावा, तलवारीसारखा करू नये. बाबासाहेबांनी देव नाकारला होता. पण उत्सवाच्या निमित्ताने त्यांची देवासारखी पूजा केली जात आहे. 
- वैशाली शिंदे, सहायक पोलिस आयुक्त

समाज कर्मकांडात अडकला होता. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारून आपल्या समाजाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आजही अनेकांना वैचारिक गुलामगिरी म्हणजे आभूषणे वाटतात. स्त्रिया आजही पोथ्यांची पारायणे करतात. आजही बहुजन समाजातील महिलांना संस्कृतीच्या नावाने वैचारिक गुलामगिरीत अडकवले जात आहे. जगातले सगळेच धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिले आहेत. पुरुषांनी स्वतःसाठी सवलती ठेवून घेतल्या आहेत. सगळे नियम महिलांनाच लागू आहेत. आज बाबासाहेब असते तर महिलांची ही अवस्था पाहून त्यांना दु:ख झालं असतं. 
- निशा भोसले, 
राज्य पदाधिकारी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती 

बाबासाहेबांचे विचार डोक्‍यावर घेण्यापेक्षा डोक्‍यात घ्यायला हवेत. समाजशास्त्र काय हे घरातूनच शिकवणे आवश्‍यक आहे. आंबेडकरी चळवळ सकारात्मक पद्धतीने मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाज बदण्यासोबतच आपण आपलं कुटुंबही बदललं पाहिजे. 
- रेश्‍मा गायकवाड, 
अध्यक्षा, एकता सामाजिक बहुउद्देशीय संस्था 

राष्ट्रपुरुषांना कोणत्याही एका जातीत बांधणे चुकीचे आहे. त्यांचे विचार प्रत्यक्ष अमलात आणले पाहिजे. आपली मानसिक गुलामगिरी दूर करून सर्वांनी समानतेने वागायला हवे. समाजासोबतच प्रत्येकाने आपल्या घरातही सुधारणा करावी. आपल्या आडनावावरून जात कोणती आहे हे पाहिले जाते. यासाठी फक्त नावच वापरायला हवे. बाबासाहेबांनी दलितांसोबतच सर्व जाती-धर्मासाठी काम केले आहे. 
- प्राजक्ता बागल, 
सदस्या, जिजाऊ ब्रिगेड

माणसाला माणसासारखे जगता यावं म्हणून बाबासाहेबांनी समानता आणली. ग्रामीण भागात आजही मुलींचे लग्न कमी वयात केले जाते. मुलींना शिकू दिले जात नाही. शिक्षणातून वागण्यात, जगण्यात बदल होतो. पोथ्या, पुराण हे कर्मकांड आहेत. ते वाचून आचरणात बदल होईल पण पुस्तके वाचली की विचारात बदल होते. यासाठी मंडळांनी जयंतीवर मोठा खर्च करण्यापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. 
- वसुंधरा शर्मा, शिक्षिका 

महिलांचे समाजातील योगदान किती आहे यावरून समाजाची स्थिती दिसून येते. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यासाठी काम केलेच शिवाय त्यांनी एक पत्रकार म्हणूनही चांगल्या पद्धतीने काम केले आहे. पर्यावरण संवर्धनाचा विचारही त्यांनी मांडला. नदीजोड प्रकल्पही त्यांनी मांडला होता. सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणला गेला पाहिजे. 
- प्रा. रेश्‍मा माने, अध्यक्षा, युगंधर फाउंडेशन 

सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी महत्त्वाच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधले. हिंदू धर्मातील कायद्यांमुळे महिलांवर अनेक बंधने होती. त्यांनी महिलांच्या कल्याणासाठी हिंदू कोडबिल तयार केले. महिला शिकणार नाही तोपर्यंत तिचे कुटुंब शिक्षित होणार नाही, असा विचार महात्मा फुले यांनी मांडला होता. यासाठी बाबासाहेबांनी त्यांना गुरू मानले होते. सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून बाबासाहेबांचे कार्य समाजापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न होत आहे. 
- प्रा. वनिता सावंत-चंदनशिवे

संविधान हे कोणत्याही एका जाती-धर्मासाठी नाही. मनुस्मृती जाळून त्यांनी सर्वांना माणसासारखे जगण्याचा अधिकार दिला. आम्ही बार्टीच्या माध्यमातून खेड्यांत जाऊन बाबासाहेबांचे विचार लोकांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करतोय. शाळा, महाविद्यालयांसह महिला बचत गटांच्या सदस्यांशी आम्ही संवाद साधत आहोत. सर्वच राष्ट्रपुरुषांच्या जयंती उत्सवात होणारा खर्च एखाद्या चांगल्या कामासाठी वापरायला हवा. 
- अश्‍विनी सुपाते, समतादूत, बार्टी

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Coffee With Sakal Program In Solapur