रस्त्यारस्त्यांवर शीतपेय विक्रीचे पेव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

‘ई- कोलाय’चे दुष्परिणाम
सरबते आणि गोळे बनवण्यासाठी वापरला जाणारा बर्फ आणि पाण्यात आरोग्यास घातक असलेला ई-कोलाय विषाणू असल्याचे मुंबई पालिकेने नुकत्याच केलेल्या पाहणीत उघड झाले. पालिकेने घेतलेल्या नमुन्यांपैकी ८७ टक्के नमुन्यांत हा घातक विषाणू आढळला. ई-कोलाय विषाणूमुळे पचनसंस्थेवर विपरित परिणाम होतो. ई-कोलाय असलेले सरबत प्यायल्यास अतिसाराचा त्रास होऊ शकतो, तसेच विषबाधाही होऊ शकते.

सातारा - उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने थंडगार पेय विक्रीचा व्यवसाय जोमात आला आहे. रस्त्यारस्त्यांवर थंडा- सरबत, ज्यूसच्या गाड्यांचे अक्षरश: पेव फुटल्याचे चित्र आहे. रस्त्यांवरील अशा दूषित शीतपेयांमुळे विविध आजार बळावण्याचीही भीती आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशा पदार्थ, द्रवांची तपासणी करून अयोग्य आढळल्यास कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. 

उन्हाळ्याच्या दिवसांत बर्फाचा गोळा, रस्त्यावरच्या गाड्यांवरचे रंगीत सरबत व फळांचा रस पिण्याकडे अनेकांचा कल असतो. थंडावा मिळण्यासाठी त्यात बर्फाचे तुकडे टाकतात; परंतु सरबत व बर्फ तयार करण्यासाठी अनेक ठिकाणी दूषित पाणी वापरले जाते. साताऱ्यात अनेक ठिकाणी फळांच्या रस विक्रीच्या गाड्या लागलेल्या दिसतात. या गाड्यांवर फळांचा रस मिळेल, अशी जाहिरात केली जाते. 

तीव्र ऊन व प्लॅस्टिकमुळे फळांच्या रसामध्ये विषाणू तयार होण्यास सुरवात होते. त्यामुळे अशा दूषित रसांतून पोटाचे विकार जडण्याची शक्‍यता आहे. बर्फ बनवण्यासाठी दूषित पाणी वापरल्याने कावीळ किंवा टायफाईडचा धोका असतो. 

उन्हाचा पारा वाढत असल्याने अनेक जण आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, लिंबू सरबत यावर ताव मारतात. मात्र, त्यात टाकलेला बर्फ हा खाण्यायोग्य आहे की नाही, याची माहिती नसते. बर्फाची क्‍यूब ही शुद्ध पाण्यापासून बनविली जाते. मासे साठविण्यासाठी व शवागृहांमध्येही लादीचा बर्फ वापरला जातो.

हा बर्फ बनवणारे कारखाने अनेक ठिकाणी आहेत. हा स्वस्तातील बर्फ फेरीवाले सरबतासाठी, तसेच गोळा तयार करण्यासाठी वापरत असल्याने विविध आजार बळावतात. त्या पार्श्‍वभूमीवर ‘एफडीए’च्या पथकाने रस्त्यांवर सरबत विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सरबत, ज्यूस विक्रेत्यांनी पांढरा, शुद्ध बर्फच वापरला पाहिजे. जिल्ह्यात बर्फ बनविणारे नऊ कारखाने असून, त्यांनाही सूचना दिल्या आहेत. लवकरच आम्ही थंडगार द्रव विकणाऱ्यांचे नमुने घेऊन त्याची तपासणी करणार आहोत. दोषींवर कारवाई करू.
-एस. बी. कोडगिरे, सहायक आयुक्‍त, अन्न व औषध प्रशासन. 

Web Title: Cold Drink Sailing Health Care