थंडी वाढल्याने वातावरण आल्हाददायक

थंडी वाढल्याने वातावरण आल्हाददायक

आर्द्रता कमी, ढगांचे तुरळक पुंजके, वाऱ्याचा वेगही मध्यम
कोल्हापूर - चार ते पाच दिवस "ऑक्‍टोबर हिट'प्रमाणे जाणवणारा उकाडा दोन दिवसांत पुन्हा सुरू झालेल्या थंडीमुळे कमी झाला. यामुळे शहर परिसरातील वातावरण आल्हाददायक बनले. दुपारी चारनंतर पश्‍चिम घाटमाथ्यांवरून बाष्प घेऊन येणारे वारे हवेत गारठा निर्माण करत आहे. थंडीचा प्रभाव मध्यरात्री वाढून तो सकाळी 11 पर्यंत जाणवत आहे. दुपारी 28 ते 31 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान स्थिर राहत आहे. आज मध्यरात्री 11 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान उतरले. दिवसा तापमान 28 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहिले. ढगांची घनता 13 टक्केपर्यंत तर वाऱ्याचा वेग पाच किलोमीटर प्रति तास होता.

कदमवाडी, भोसलेवाडी, कसबा बावडा, रमणमळा, न्यू पॅलेस परिसर, जुना बुधवार पेठ, गंगावेस, फुलेवाडी, रंकाळा परिसर, उपनगरात पहाटे धुके होते. यामुळे चार दिवसांत वातावरणातील दृश्‍यतेचे प्रमाण हे 16 किलोमीटर इतके राहिले. परिसरात पंचगंगा नदी, रंकाळा तलावामुळे थंडीचा प्रभाव सकाळी नऊ ते दहापर्यंत राहत आहे. शहराभोवती पिकांसाठी होणाऱ्या सिंचनामुळे रात्री थंडीचा जोर वाढतो. यामुळे सकाळी फिरण्यास जाणारे नागरिक कानटोपी, हातमोजे, पायमोजे, स्वेटर्स घालून बाहेर पडत आहेत.
इंटरपॅनेल गव्हर्न्मेंट ऑन क्‍लायमेट चेंजमधील अहवालाने भारतातील हिवाळा 2036 पर्यंत उष्ण रअसेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. गतवर्षी हा अंदाज खरा ठरला. कमी पाऊस होण्याबरोबर थंडी उशिरा सुरू झाली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच थंडी गायबही झाली. परिणामी आंब्यांना मोहोर, विविध वृक्षांवरील फुलोरा उशिरा आला. यावर्षी मात्र ही परिस्थिती नाही. गेल्या चार दिवसांचा कालावधी सोडला तर दिवाळीनंतर थंडीचे प्रमाण चांगले राहिले. तसेच परिसरातील न्यू पॅलेस, कळंबा आदी तलाव तुडुंब भरलेले असल्यामुळे हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. भरपूर थंडी, अन्नाच्या मुबलकतेमुळे पक्ष्यांचा अधिवास यावर्षी वाढू शकतो, असे मत पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केले.

आंब्यांना भरपूर मोहोर
यंदा थंडी लवकर सुरू झाल्यामुळे आंब्यांना भरपूर मोहोर आला आहे. आकाशही फारसे ढगाळ आणि वातावरण कुंद नसल्यामुळे मोहोरोला अनुकूल वातावरण आहे. थंडीमुळे काळा वाटाणा, हरभरा, पालेभाज्या, फळभाज्यांना अनुकूल वातावरण आहे. थंडीची ही लाट जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत अशीच राहिली तर द्विदल धान्यवर्गीय पीक उत्पादन चांगले वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com