राज्यात युती; पण जिल्ह्यात अधांतरीच

विकास कांबळे : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

कोल्हापुरातील शिवसेना आणि भाजप यांच्यातही फारसे सख्य नाही. अशा परिस्थितीत भाजप व शिवसेनेच्या राज्यातील नेत्यांनी नगरपालिका निवडणुकीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. काही तालुक्‍यांतील भाजप व सेनेच्या नेत्यांनी राज्यातील नेत्यांची वाट न पाहताच एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र काही ठिकाणी शिवसेना जागांसाठी आग्रही राहणार असल्याने मैत्रीपूर्ण लढती कराव्या लागतील.

कोल्हापूर - नगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यात भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी युती करण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी जिल्ह्यात या निर्णयाची शंभर टक्‍के अंमलबजावणी होण्याची शक्‍यता कमी असल्याचे चित्र आहे. भाजपने स्थानिक गटांना हाताशी धरून त्यांच्याशी महिनाभरापासून चर्चा सुरू ठेवल्या आहेत. बहुतांश ठिकाणचे त्यांचे उमेदवारही निश्‍चित होत आले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातून युती करण्याचा आलेल्या आदेशामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

भाजप व शिवसेना यांच्यातील गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे संबंध सारखेच आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जशा जवळ येतील तसे हे संबंध अधिकच सुदृढ होताना दिसत आहेत. कोल्हापुरातही भाजप आणि शिवसेनेचे संबंध सांगण्याच्या पलिकडे आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना एकत्र लढतील, अशी अपेक्षा होती; मात्र भाजपने शिवसेनेकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यांनी महाडिक यांच्या ताराराणी आघाडीशी जवळीक करत निवडणूक लढविली आणि त्यात त्यांना चांगले यशही मिळाले. शिवसेनेचे वारे असूनही त्यांना मात्र महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा फायदा उठविता आला नाही. मनपा निवडणुकीनंतर भाजपने जिल्ह्यात पक्षाचे स्थान बळकट करायचे असेल तर सहकाराशिवाय शक्‍य नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. सहकारातील नेत्यांना पक्षात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. टाकलेल्या गळाला मोठे मासे लागण्यास सुरवात झाली आहे. त्यापैकी काहींनी थेट पक्षात प्रवेश केला, तर काहींनी आपले अस्तित्व कायम ठेवून पाठिंबा दिला. त्याचा निश्‍चितच जिल्ह्याच्या राजकारणावर कमी-अधिक प्रमाणात फरक पडणार आहे.

नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भाजप दीड, दोन महिन्यांपासून काम करत आहे. निवडणुका जाहीर झाल्याबरोबर त्यांना लोकांच्या प्रवेशाचा कार्यक्रम सुरू केला आहे.

Web Title: Collaboration in State; but what about district