Vidhan Sabha 2019 : वस्त्रोद्योगाचे अनुदान लाटणाऱ्यांकडून करणार वसूल; स्मृती इराणींचा इशारा

इचलकरंजी - आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलतांना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी. 
इचलकरंजी - आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलतांना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी. 

इचलकरंजी - वस्त्रोद्योगातील अनुदानाच्या नावाखाली ज्यांनी शासनाची तिजोरी लुटली आहे, त्या प्रत्येक पैशाची वसूली केली जाईल. प्रसंगी कठोर कारवाईलाही सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना दिला.

वस्त्रोद्योगाच्या उज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. येथील नामदेव मैदानावर आज झालेल्या निश्‍चय सभेत त्या बोलत होत्या. 

अतिशय आक्रमक शब्दात मंत्री स्मृती इराणी यांनी थेट नाव न घेता माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यावर सडकून टिका केली. त्या म्हणाल्या, ""विरोधी उमेदवार आपली सटकली असल्याचे सांगत आपली मानसिक स्थिती बरोबर नसल्याची कबुलीच देत आहे. कांही दिवसांपूर्वी हेच विरोधी उमेदवार मला भेटून तुमचे काम चांगले असल्याचे सांगून माझ्यासोबत फोटोही काढले होते. आणि आता काय केले नाही, म्हणून मला आव्हान देत आहे. त्यांनी 113 कोटीच्या मेगा क्‍लस्टरच्या योजनेत मोठा घोळ घातल्याचे कागदपत्रातून स्पष्ट झाले आहे. आपला उद्योग चालविण्यासाठी त्यांनी शासनाची तिजोरी लुटली आहे. आता त्यांना निवडून दिल्यास ते शहराला किती लुटतील हे सांगता येणेही अवघड आहे.""

त्या म्हणाल्या, ""काँग्रेसच्या राजवटीत टफ योजनेतून केवळ 50 कोटी रुपये इचलकरंजी शहरासाठी दिले होते. पण गेल्या तीन वर्षात 177 कोटी रुपये दिले आहेत. यातून अनेक यंत्रमाग उद्योगांची वाढ झाली असून तितकीच रोजगार निर्मितीही झाली आहे. काँग्रेसच्या राजवटीत वस्त्रोद्योगातील योजनांसाठी असलेला निधी वापरला जात नव्हता. मोदींच्या कालावधीत सर्व निधीचे वाटप केले जात आहे.""

आमदार हाळवणकर म्हणाले, "" खासदार धैर्यशील माने व आपण दोघेजण मिळून केंद्र व राज्य शासनाकडून यापुढील काळात अधिक भरीव निधी आणू. वस्त्रोद्योगासाठी केंद्राने विविध योजना जाहीर केल्या आहेत. पण त्यांना अद्याप गती आलेली नाही. दुसरीकडे वस्त्रोद्योगाच्या नावाखाली केंद्राकडून कोट्यवधीचा निधी लुटल्यानंतरही शहराची वाट लागली, अशी बदनामी करण्याचे काम विरोधकांकडून सुरु आहे. लुटलेला हा निधी त्यांच्याकडून वसूल करावा.""

कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, धोंडीराम जावळे, अनिल डाळ्या, ऋषभ जैन यांची भाषणे झाली. नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, अशोक स्वामी, हिंदूराव शेळके, अजितमामा जाधव, विजया महाजन, अरुण इंगवले, महादेव गौड, महावीर गाट, सयाजी चव्हाण, अमृत भोसले, अमरजीत जाधव, शहाजी भोसले, मिश्रीलाल जाजू, रवी रजपूते, धोंडीराम जावळे, सचिन हुक्कीरे आदी उपस्थित होते.

भाषणाला मराठीतून सुरूवात....!
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. आपल्या पंचवीस मिनिटाच्या भाषणात त्यांनी अनेकवेळा मराठीतून संवादफेक केली. त्याला उपस्थितांनी जोरदार दाद दिली. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com