जिल्हाधिकारीडॉ. चौधरी म्हणाले,  कोरोना संशयितांना खासगी डॉक्‍टरांनी कोविड हॉस्पीटललाच पाठवा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

सांगली : खासगी हॉस्पीटलमधील डॉक्‍टरांनी कोरोनाच्या अनुषंगाने स्वत:सह कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी. एखादा संशयित आढळल्यास कोविड हॉस्पीटलला पाठवावे. कोणत्याही प्रकारे विलंब करू नये. त्या रूग्णाची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाला द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिल्या. 

 सांगली : खासगी हॉस्पीटलमधील डॉक्‍टरांनी कोरोनाच्या अनुषंगाने स्वत:सह कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी. एखादा संशयित आढळल्यास कोविड हॉस्पीटलला पाठवावे. कोणत्याही प्रकारे विलंब करू नये. त्या रूग्णाची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाला द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिल्या. 

कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमधील डॉक्‍टरांनी घ्यावयाची खबरदारी या विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. 

जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिरी गोसावी, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, सांगली व मिरज येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे विविध पदाधिकारी यांच्यासह डॉक्‍टर्स उपस्थित होते. 

डॉ. चौधरी म्हणाले,""हेल्थ केअर वर्कर्सनी योग्य पध्दतीने पीपीई घालणे आवश्‍यक आहे. रूग्णांची हालचाल मर्यादित ठेवणे आवश्‍यक आहे. रूग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमीत कमी ठेवण्यासाठी प्रयत्न करा. प्रोसिजर रूममध्ये गर्दी टाळावी. एखाद्याची तपासणी केल्यानंतर इन्स्ट्रुमेंटचे निर्जुंतीकरण करूनच पुन्हा वापर करावा. वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांपर्यंत प्रशिक्षण द्यावे. संशयित पॉझिटीव्ह आहे, असे गृहित धरूनच काळजी घ्यावी. रूग्ण कोविड हॉस्पीटलला पाठवताना त्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यासह रूग्ण कोविड हॉस्पीटलला पोहोचला याची खात्री करावी. कंटेनमेंट झोन लगतच्या हॉस्पीटलनी अधिक दक्षता घेणे आवश्‍यक आहे.'' 

डॉ. साळुंखे यांनी कोविड-19 च्या अनुषंगाने डॉक्‍टरांनी हॉस्पीटलमध्ये घ्यावयाची खबरदारी, करावयाच्या उपाययोजना व उपचार पध्दती विषयी सादरीकरण केले. 
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी व डॉ. साळुंखे यांनी शंकांचे निरसन केले. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector Dr. Chaudhary said the Corona suspects should be sent to Kovid Hospital by private doctors