कृष्णा नदी प्रदूषणाबाबत सांगली पालिकेवर कारवाई करण्याचे आदेश

कृष्णा नदी प्रदूषणाबाबत सांगली पालिकेवर कारवाई करण्याचे आदेश

सांगली - कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांगली महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. शेरीनाला, १०० फुटीचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प १५ दिवसांत कार्यान्वित करावा. अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायद्यातील तरतुदीनिहाय नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिले. 

जिल्हा पर्यावरण समिती बैठकीत जिल्हाधिकारी काळम बोलत होते. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त मौसमी बर्डे, जिल्हा उद्योग केंद्राचे नितीन कोळेकर यांच्यासह नगरपरिषद मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी काळम म्हणाले,‘‘महानगरपालिकेने राष्ट्रीय नदी कृती आराखडा तयार करून सादर करावा. शेरीनाला व इतर नाल्यांचे सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळल्याने नदीचे प्रदूषण वाढले आहे. ही बाब थेट नागरिकांच्या आरोग्याशी निगडित आहे. 

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. शेरीनाल्यासाठी सांडपाणी उपसा सध्या उपलब्ध  असलेल्या पंपाशिवाय स्टॅंड बाय पंपाची व्यवस्था  करावी. तात्पुरता बांध घालून सांडपाणी अडवून त्यावर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया उभारावी. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सांगली शहरातील जैववैद्यकीय कचऱ्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल येत्या मंगळवारपर्यंत सादर करावा.’’

ते म्हणाले,‘‘राष्ट्रीय हरित लवाद पुनरुत्थानाबाबतच्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने नदी प्रदूषणास जबाबदार असणारे सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतीने तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लघू कालावधीची तसेच दीर्घ कालावधीची उपाय योजनाबाबतचा कृती आराखडा ३१ जानेवारी पर्यंत सादर करावयाचा आहे. कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया केलेले किंवा विनाप्रक्रिया सांडपाणी थेट नदीमध्ये सोडता येणार नाही. त्यासाठी आवश्‍यक उपाययोजना कराव्यात.’’

महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, नगरपालिका मुख्यकार्यकारी अधिकारी इस्लामपूरचे  दीपक झिंजाड, विट्याचे महेश रोकडे, तासगावचे गणेश शिंदे, कडेगावचे चरण कोल्हे, जतचे अभिजित हराळे, शिराळ्याचे अशोक कुंभार, आरोग्य विभागाचे डॉ. संतोष पाटील, पाटबंधारेचे उपकार्यकारी अभियंता श्रीपतराव मलभन, आष्ट्याचे सुरेश कांबळे, कवठेमहांकाळचे झाकिर सावनूरकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com