मोबाईल चोरीसाठी महाविद्यालयीन युवकाच्या अपहरणाचा प्रयत्न

मोबाईल चोरीसाठी महाविद्यालयीन युवकाच्या अपहरणाचा प्रयत्न

सांगली - मोबाईल चोरीसाठी महाविद्यालयीन युवकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार दिवसाढवळ्या घडला. कॉलेज कॉर्नर चौकातील पेट्रोल पंपाजवळ सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. श्रेयस श्रीनिवास जोशी (वय १७, रा. कवलापूर) असे युवकाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस कवलापूरमध्ये राहतो. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. सध्या सुटी आहे. मात्र, खासगी शिकवणीसाठी तो रोज सांगलीत येतो. शिकवणी संपल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास कॉलेज कॉर्नर चौकातील पेट्रोलपंपाजवळ तो थांबला होता. दोघे तेथे आले. रस्ता कवलापूरला जातो का?  असे त्यांनी विचारले. श्रेयसने हो म्हणून सांगितल्यानंतर त्याला ‘तू कुठे जाणार आहेस?’ असे विचारले. त्यानेही कवलापूरला, असे सांगितले.

दोघांनीही त्याला गाडीवर बसवले. काही वेळेतच एकाला पैसे द्यायचे आहे, असे सांगून शंभरफुटी रस्त्यावर आणले. डी-मार्टजवळ एक जण उतरला. एक जण श्रेयसला धामणी रस्त्यावर घेऊन गेला. श्रेयसकडून जबरदस्तीने मोबाईल काढून घेतला. स्क्रीन लॉक निघत नसल्याने त्यांनी मारहाण केली. त्यानंतर पलायन केले. घाबरलेला श्रेयस तेथीलच एका ऑफिसमध्ये गेला. तेथून वडिलांना हकिकत सांगितली. वडील तातडीने तेथे आले. त्यानंतर ते शहर पोलिस ठाण्यात गेले. रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. 

टोळी कार्यरत 
तीन दिवसांपूर्वी याच परिसरातून कवठेएकंदच्या युवकाला मारहाण करून लुटले होते. युवकांचे अपहरण करून मोबाईल चोरी करणारी ही टोळी शहरात कार्यरत आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com