युवा महोत्सवासाठी यंदाही महाविद्यालये अनुत्सुक

तात्या लांडगे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

सोलापूर विद्यापीठातर्फे दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींमधील विविध कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यासाठी इच्छुक महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागवून त्यांना यजमानपद दिले जाते. यंदाच्या युवा महोत्सवासाठी 20 ऑगस्टपर्यंत महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु, अद्यापपर्यंत एकाही महाविद्यालयाकडून प्रस्ताव आला नसल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींमधील विविध कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यासाठी इच्छुक महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागवून त्यांना यजमानपद दिले जाते. यंदाच्या युवा महोत्सवासाठी 20 ऑगस्टपर्यंत महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु, अद्यापपर्यंत एकाही महाविद्यालयाकडून प्रस्ताव आला नसल्याची माहिती समोर आली आहे.

युवा महोत्सवसाठी यजमानपद स्विकारणाऱ्या महाविद्यालयासाठी भरमसाट अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकवेळा विद्यापीठ प्रशासनाला ठराविक महाविद्यालयांना विनंती करण्याची वेळ येते. विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ करण्याची सातत्याने महाविद्यालयांकडून मागणी होते. परंतु, त्याबाबतीत विद्यापीठाकडून अद्यापही विचार करण्यात आलेला नाही. युवा महोत्सवासाठी यजमानपद स्वीकारणाऱ्या महाविद्यालयाकडे मोठे बंदिस्त नाट्यगृह असावे आणि त्याची प्रेक्षक क्षमता किमान दोन हजारांची असावी, एक खुले नाट्यगृहदेखील असावे, त्याठिकाणी मध्यम आकाराचे व्यासपीठ असावे, विद्यार्थ्यांना कलाप्रकाराची तयारी करण्याकरिता मोठे हॉल अथवा वर्ग असावेत.

तसेच, एक हजार 200 विद्यार्थी व 500 विद्यार्थिनी, 70 पुरुष आणि 40 महिला संघव्यवस्थापक, 60 परीक्षकांच्या राहण्याची उत्तम सोय असावी. दररोज दोन हजार जणांच्या जेवणाची उत्तम व्यवस्था चार दिवस संबंधित महाविद्यालयाकडून व्हावी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. त्यासाठी किमान 10 लाखांचा खर्च अपेक्षित असून विद्यापीठाकडून फक्‍त सहा लाख रुपयेच मिळतात. त्यामुळे अनेकवेळा महाविद्यालये युवा महोत्सवाचे यजमानपद स्वीकारण्यासाठी अनुत्सुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

विद्यापीठातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या यावर्षीच्या युवा महोत्सवाचे यजमानपद स्वीकारण्यासाठी एकाही महाविद्यालयाचा प्रस्ताव आला नसल्याचे समजले. आज कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढे कोणत्या महाविद्यालयास विनंती करायची हे ठरविले जाईल. - प्रा. सुर्यकांत पाटील, संचालक, विद्यार्थी विकास विभाग

Web Title: colleges are unsatisfactory for the youth festival