चला... अंधाराच्या गावा... 

दत्ता इंगळे 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

नगर तालुका ः पिंपळगाव लांडगा (ता. नगर) येथील महापारेषणचे 132 केव्ही उपकेंद्र महापारेषण व पिंपळगाव लांडगा (ता. नगर) यांच्यातील ग्रामपंचायतीच्या थकीत कराच्या वादातून काल (सोमवार)पासून बंद होते. त्यामुळे नगर तालुक्‍यातील 25 गावांना अंधारात राहावे लागले. या गावांत पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांच्या पाण्याचा खोळंबा झाला आहे. आज सायंकाळी झालेल्या बैठकीत थकीत कराबाबत 26 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उपकेंद्राचे टाळे काढण्यात आले आणि वीजपुरवठा सुरळीत झाला. 

mehakari

45 लाख थकीत 
पिंपळगाव लांडगा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वीज उपकेंद्राचा कर महापारेषणने गेल्या तीन वर्षांपासून भरलेला नाही. ही जागा खरेदी करताना त्यावर काही थकीत कर होता. त्यासह गेल्या तीन वर्षांत कराची थकीत रक्कम 45 लाख 80 हजार रुपये इतकी झाली आहे. थकबाकीमुळे ग्रामपंचायतीने काल (सोमवारी) महापारेषणच्या उपकेंद्राला सील केले. या उपकेंद्रावरून महावितरण कंपनी नगर तालुक्‍यातील चिचोंडी पाटील, नारायणडोह, कापूरवाडी व मेहेकरी या चार लहान उपकेंद्रांवरील 25 गावांना वीजपुरवठा करते. मात्र, थकीत कराच्या वादातून या गावांना कालची रात्र अंधारात काढावी लागली. mehakari 1शेतीच्या कामांचा खोळंबा 
दिवसभरही वीजपुरवठा बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. बहुतेक भागात गहू, हरभरा पेरणीचे काम सुरू आहे. मात्र, शेतात वीज उपलब्ध नसल्याने ही कामे थांबली होती. शेतकऱ्यांनी विहिरी व कूपनलिकेतून पाणी आणून जनावरांची तहान भागविली. 
दरम्यान, सायंकाळी नगर येथील महापारेषण कार्यालयात महापारेषण व जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि पिंपळगाव लांडगा ग्रामस्थांची बैठक झाली. तीत अधिकाऱ्यांनी 26 डिसेंबरपर्यंत थकीत कराबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामपंचायतीने वीज उपकेंद्राचे सील काढले. नंतर सायंकाळी उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाला. 

ग्रामपंचायतीला कर मिळावा 
महापारेषणने गेल्या तीन वर्षांचा ग्रामपंचायत कर भरावा. तालुक्‍यातील इतर गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. यात ग्रामपंचायतीचा कुठलाही हेतू नव्हता. ग्रामपंचायतीला कर मिळावा, ही ग्रामस्थांची मागणी आहे. 
- शकुंतला पवार, सरपंच, पिंपळगाव लांडगा 

वीजपुरवठा सुरळीत 
चारही फीडरवरील ग्राहकांनी, गावांच्या सरपंचांनी दूरध्वनी करून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. यात महापारेषण व संबंधित ग्रामपंचायतीत समेट घडून वीजपुरवठा सुरळीत केला. 
- के. बी. कोपनर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण 

26 डिसेंबरपर्यंत निर्णय 
पिंपळगाव लांडगा ग्रामपंचायतीने सोमवारी सायंकाळी वीज उपकेंद्राला सील केले होते. आज कार्यालयात झालेल्या बैठकीत 26 डिसेंबरपर्यंत या प्रकरणावर निर्णय घेऊ, असे त्यांना सांगितले आहे. 
- अरविंद बडे, उपकार्यकारी अभियंता, महापारेषण 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Come to the village of darkness ...