कमिशनवर नोटा बदलायला जाल तर कारवाई 

blackmoney
blackmoney

कोल्हापूर - काळा पैसा मुरवण्यासाठी दुसऱ्याच्या खात्यावर अडीच लाख रुपयांपर्यंत रक्कम भरण्याचा प्रयत्न करणे किंवा आपल्या नोटा बदलून घेण्यासाठी कमिशनवर दुसऱ्या लोकांना रांगेत उभे करणे असे प्रकार निदर्शनास आले तर त्याची तक्रार आता पोलिस ठाण्यात देता येणार आहे किंवा थेट तक्रार नसली तरी अमूक एक व्यक्ती असा प्रकार करत आहे, याची बऱ्यापैकी पुराव्यासह माहिती आयकर विभाग व पोलिसांपर्यंत पोचवता येणार आहे. 

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात काळा पैसा मुरविण्याचे प्रकार वाढले आहेत. जुन्या नोटा असलेले अडीच लाख रुपये 30 डिसेंबरपर्यंत बॅंक खात्यात जमा करता येतील. या सवलतीमुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांनी आपले पैसे दुसऱ्याच्या खात्यावर कमिशनचे आमिष दाखवून भरण्यास सुरवात केली आहे. एक लाख तुमच्या खात्यावर भरा व त्या बदल्यात दहा ते वीस हजार रुपये कमिशन घ्या, अशा स्वरूपाचे हे व्यवहार आहेत. याबरोबरच चार हजार रुपयांच्या नोटा लगेच बदलून घेता येत असल्याने या नोटा बदलून घेण्यासाठीही कमिशनवर लोकांना उभे केले जात आहे. यातून फार मोठी रक्कम मुरवता येणार नसली तरीही भेदरलेल्या काळा पैसाधारकांनी आता सगळेच पैसे बुडू नयेत म्हणून आमिष दाखविण्याचा हा फंडा चालवला आहे. काही लोक या आमिषाला बळी पडत आहेत. पन्नास, साठ हजार रुपये आपल्या खात्यावर भरले तर कोण कधी चौकशी करणार आहे, अशा समजुतीत हे लोक आहेत. 

आता 500 रुपयांच्या एक लाख नोटा देऊन त्या बदल्यात दोन महिन्यांनी 70 हजार रुपये दिले तरी चालतील, असे व्यवहार काही ठिकाणी चालू आहेत. आपले काळे पैसे कायदेशीर मार्गाने मुरवता येणार नाहीत अशी ज्यांना खात्री आहे, त्यांनीच हा बेकायदेशीर व्यवहार सुरू केला आहे. विशेष हे, की त्यासाठी अगदी गरीब नाही; पण मध्यमवर्गीयांचा आधार घेतला जात आहे. अमूक एका व्यक्तीने एकावेळी 60 ते 70 हजार रुपये खात्यावर भरले तरी संशय येणार नाही, अशी माणसे हेरून या आमिषाची भुरळ घातली जात आहे. नोटा बदलण्यासाठी जी रांग वाढत आहे, हेही एक कारण आहे. 

काळा पैसा व्हाईट करण्यासाठी आमिष दाखविण्याचा कोण प्रयत्न करत असेल, तर प्रथम तशी तक्रार दाखल करता येते आणि त्यानंतर तक्रारीची शहानिशा करून संबंधितांवर गुन्हा दाखल करता येतो. 
अमृत देशमुख (पोलिस निरीक्षक, राजारामपुरी पोलिस ठाणे). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com