विवाहिता आत्महत्येप्रकरणी पती, दीर, सासऱ्याला शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

सातारा - शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दुसरे अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एम. मोहिते यांनी संबंधित विवाहितेचा पती व दिराला पाच, तर सासऱ्याला दोन वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावला. हा दंड न दिल्यास सहा महिने कैद व सासऱ्याला दोन वर्षांची सक्‍तमजुरीची शिक्षाही सुनावली. एका वर्षातच या खटल्याचा निकाल लागला आहे. 

नितीन चंद्रकांत घोरपडे (पती) (वय 36), दीपक चंद्रकांत घोरपडे (दीर) (वय 28) व चंद्रकांत धोंडीबा घोरपडे (सासरा) (वय 72, सर्व रा. इंगळेवाडी, पो. नुने, ता. सातारा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सावित्रा नितीन घोरपडे (वय 30) यांनी मृत्युपूर्वी तक्रार केली होती. सात जानेवारी 2016 रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सावित्रा यांनी घरासमोर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा 11 जानेवारी 2016 रोजी मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात जिल्हा रुग्णालयात त्यांचा जबाब घेण्यात आला होता. त्यामध्ये संशयितांनी लग्नात हुंडा दिला नाही, काम येत नाही, कामाला बाहेर जात नाही, या कारणावरून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून मानसिक त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून पेटवून घेतल्याचे त्यांनी जबाबात सांगितले होते. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 
तत्कालीन उपनिरीक्षक हेमंत साठे यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान 12 साक्षीदार तपासण्यात आले. सहायक सरकारी वकील ऍड. आशीर्वाद कुलकर्णी यांचा युक्तिवाद व साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायाधीशांनी तिघांना दोषी धरले. सरकारी वकिलांना प्रॉसिक्‍युशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश पवार, पोलिस हवालदार वासंती वझे, शमशुद्दीन शेख, अजित शिंदे, नंदा झांझुर्णे, कांचन बेंद्रे, स्नेहल गुरव यांनी सहकार्य केले. 

Web Title: commit suicide case