सातारा शहरातील एकेरी वाहतुकीबाबत पुन्हा समिती स्थापित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

पोलिसांसह व्यापारी प्रतिनिधींचा समावेश असून ; आठवड्याभराच्या कालावधीत यावर निर्णय अपेक्षित आहे.

सातारा : व्यापारी वर्गाचा होणारा विरोध विचारात घेता शहरातील सध्याच्या एकेरी वाहतुकीमध्ये बदल करण्याबाबत पुन्हा समिती नेमण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यामध्ये पोलिस व व्यापारी प्रतिनिधींचा समावेश आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर एकेरीबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. 
ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातील वाहतूक बहुतांश विस्कळित झाली आहे. शहरातील दोन मुख्य रस्त्यांवरच अडचण निर्माण झाल्यामुळे एकंदर वाहतूक यंत्रणा विस्कळित झाली आहे. त्यामुळे सुरवातीला पोलिस दलाने एकेरी वाहतूक तात्पुरती स्थगित करत सर्वच रस्त्यांवर दुहेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु काही दिवसांनंतर वाहतुकीचा आढावा घेतल्यावर एकेरी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी या विरोधात भूमिका घेतली. वास्तविक प्रकाश मुत्याल असताना शहरात पहिल्यांदा एकेरी वाहतुकीची ट्रायल घेतली. त्यानंतर के. एम. एम. प्रसन्ना यांनी एकेरी वाहतुकीची कायमस्वरूपी प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. त्या वेळीही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला. आंदोलनाचे इशारे झाले, काही झालीही; परंतु प्रसन्ना एकेरीच्या अंमलबजावणीवरच ठाम राहिले. 
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही शहरातील वाहतुकीच्या परिस्थितीचा विचार करून एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर वाहतुकीमध्ये येणारे अडथळे विचारात घेऊन त्यात सुधारणाही केली. त्यानुसार राजपथावर दुहेरी वाहतूक सुरू केली, तसेच कर्मवीर भाऊराव पथावर पोवई नाका ते पोलिस मुख्यालय रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला ठेवला. मात्र, त्यापुढे रस्त्याच्या रुंदीमध्ये पडलेला फरक व बाजारपेठ विचारात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोती चौक ते पोलिस मुख्यालय रस्ता पोवई नाक्‍याकडे येण्यासाठी एकेरी केला. बहुतांश रस्ता दुहेरी असतानाही काही व्यापाऱ्यांना त्याबाबतही आक्षेप राहिला. त्यांनी सर्वच रस्ता दुहेरी करण्याबाबत मागणी लावून धरली. त्याबाबत निवेदनेही दिली. 
व्यापाऱ्यांची आग्रही भूमिका व त्यांनी दिलेल्या निवेदनाचा विचार करून पोलिस दलाने एकेरी वाहतुकीबाबत पुन्हा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील एकेरी वाहतुकीची पाहणी करण्याबाबत समिती स्थापण्यात आली आहे. त्यामध्ये वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक व तीन व्यापाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Committee formed on one-way traffic in Satara city