स्पर्धा परीक्षा केंद्राचीच "परीक्षा' 

अमित आवारी
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील कारभारात गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर मिसाळ यांनी प्रभारी महापालिका आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे राजीनामा दिला. नंतर या केंद्राला संचालकच मिळाला नाही. तेव्हापासून हे केंद्र बंदच आहे.

नगर : येथील महापालिकेत भले कोणी आयएएस अधिकारी यायला धजावत नसेल, नागरी सुविधा द्यायला उन्नीस-बीस होत असेल; परंतु हीच महापालिका आयएएस, आयपीएस घडवते आहे. विशेष म्हणजे, यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. असा अभिनव उपक्रम राबविणारी ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था ठरली; मात्र निधी, तसेच नियोजनाअभावी हे स्पर्धा परीक्षा केंद्र बंद पडले आहे. ते सुरू करण्यासाठी विविध परीक्षांना सामोरे जावे लागेल. पदाधिकारी त्यात उत्तीर्ण न झाल्यास चांगला उपक्रम इतिहासजमा होईल. 

हुशार गरीब विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकाजवळ 
25 एप्रिल 2007 रोजी हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले होते. महापालिकेने त्यासाठी इमारतही बांधली. प्रा. एन. बी. मिसाळ यांनी या प्रकल्पाचे संचालक म्हणून 11 वर्षे काम पाहिले. शीला शिंदे महापौर असताना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या केंद्रासाठी नवीन वास्तू बांधण्यात आली. 

हेही वाचा - "ते' टपलेत मृतदेहासाठी

परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील कारभारात गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर मिसाळ यांनी प्रभारी महापालिका आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे राजीनामा दिला. नंतर या केंद्राला संचालकच मिळाला नाही. तेव्हापासून हे केंद्र बंदच आहे. महापालिकेनेही अर्थसंकल्पात केंद्रासाठी निधीची तरतूद केली नाही, हेही कारण केंद्र बंद पडण्यास कारणीभूत ठरले. 

या केंद्रासाठी दरमहा 67 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. गेल्या 11 वर्षांत 660 विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण घेतले. त्यांतील सुमारे दीडशे विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आहेत. गेल्या दीड वर्षात 339 विद्यार्थ्यांनी या परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेशासाठी चौकशी केली. खासगी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे वर्षाला सुमारे 25 ते 30 हजार रुपये आकारतात. शहरात खासगी सुमारे 25 केंद्रे आहेत. त्यांत सुमारे दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. महापालिकेचे हे केंद्र गरीब विद्यार्थ्यांना वरदानच होते. 

दीडशे विद्यार्थी उच्चपदस्थ 
या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश परीक्षा घेऊन दर वर्षी 60 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असे. 11 वर्षांत 660 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. त्यांतील 150 विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मिळाल्याची माहिती आहे. विक्रीकर अधिकारीपदाच्या परीक्षेत अनंत भोसले व डॉ. सुहास नवले हे विद्यार्थी पहिले आले होते. भाऊसाहेब ढोले (अपर पोलिस अधीक्षक), वैशाली आव्हाड (नायब तहसीलदार), डॉ. सचिन एकलहरे (मंत्रालय सहायक), वर्षा शिंदे (पोलिस उपनिरीक्षक), सागर डापसे (सहायक गुप्तवार्ता अधिकारी), डॉ. सचिन धस (सहायक आयुक्‍त), डॉ. शिवाजी पवार (सहायक पोलिस आयुक्‍त) आदी विद्यार्थी येथे मार्गदर्शन घेऊन यशस्वी झाले आहेत. त्यांचाही या केंद्रासाठी उपयोग करून घेता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Competition Examination Center's "Exam"