स्पर्धा परीक्षा केंद्राचा कायापालट होणार 

दिलीपकुमार चिंचकर
बुधवार, 9 मे 2018

सातारा -शेतकऱ्यांच्या मुलांना सनदी अधिकारी होण्याची संधी मिळावी, यासाठी मार्गदर्शन करणारे येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमधील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र राज्यात आदर्श करण्याचा चंग रयत शिक्षण संस्थेने बांधला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून प्रत्येक विद्यार्थ्याला संशोधन व अभ्यासाच्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. 

सातारा -शेतकऱ्यांच्या मुलांना सनदी अधिकारी होण्याची संधी मिळावी, यासाठी मार्गदर्शन करणारे येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमधील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र राज्यात आदर्श करण्याचा चंग रयत शिक्षण संस्थेने बांधला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून प्रत्येक विद्यार्थ्याला संशोधन व अभ्यासाच्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. 

दरम्यान, कमवा आणि शिका योजनेचे माजी विद्यार्थी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या केंद्रासाठी सव्वाकोटी रुपयांची देणगी जाहीर केली असून, 40 लाख रुपये नुकतेच दिले आहेत, तर बॅ. पी. जी. पाटील प्रतिष्ठानने 17 लाखांची देणगी दिली आहे. "रयत' आता मुले उच्च पदावर पोचावीत, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळेच विविध महाविद्यालयांत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केली आहेत. छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये उभारलेल्या मार्गदर्शन केंद्रातून आजवर 583 विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कार्यरत झालेत. केंद्र संचालक डॉ. शिवाजी पाटील व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून केंद्राने मोठा लौकिक मिळविला आहे. सध्याही या केंद्रात समृद्ध ग्रंथालय, इंटरनेट सुविधा, सराव प्रश्‍नपत्रिका, सामान्य ज्ञानासाठी विविध प्रकारची पुस्तके, वृत्तपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. या केंद्राला बॅ. पी. जी. पाटील व प्राचार्या सुमतीबाई पाटील यांचे नाव दिले आहे. या केंद्राकडे विद्यार्थ्यांचा असलेला ओढा पाहून शिक्षणाच्या सर्व अत्याधुनिक सुविधानी केंद्र परिपूर्ण करण्याचा निर्णय संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी घेतला आहे. 

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील सुविधा 
- कॉलेजच्या आवारातच भव्य चार मजली इमारत 
- दुपारी 12 ते रात्री दहापर्यंत सुरू राहणारी अभ्यासिका 
- सर्व सोयींनी युक्त व्याख्यान कक्ष, तज्ज्ञ मार्गदर्शक 
- प्रत्येक विद्यार्थ्याला इंटरनेटसह संगणक, एलसीडी व्यवस्था 
- समृद्ध ग्रंथालय, देशातील तज्ज्ञांची व्याख्याने 

शेतकऱ्यांची मुले मोठ्या पदावर गेली पाहिजेत, हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्वप्न होते. अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या शहरातील मार्गदर्शन केंद्रात जाऊन अभ्यास करणे मोठ्या शुल्कामुळे शक्‍य होत नाही. त्यामुळेच हे केंद्र सुरू केले आहे. 

- डॉ. अनिल पाटील, कार्याध्यक्ष, रयत शिक्षण संस्था  

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांतही अत्युच्च गुणवत्ता असते. आमचे साडेपाचशेहून अधिक विद्यार्थी अधिकारी झालेत. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा देणे आमचे कर्तव्य समजतो. 

- प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, सचिव, रयत शिक्षण संस्था

Web Title: Competitive Examination Center will be transformed