तक्रार केल्याने जातीबाहेर काढले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

पुन्हा घेण्यासाठी दोन लाखांची मागणी; बारा जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा
नगर - पोलिसांकडे वैदू समाजाची जातपंचायत रद्द करण्याची मागणी केल्याने पंचांनी एकाच्या कुटुंबालाच जातीबाहेर काढले. पुन्हा जातीत घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. याबाबत तोफखाना पोलिसांनी 12 जणांविरुद्ध काल रात्री खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

मारुती सीताराम शिंदे, बाबू शंकर धनगर, मुसला शंकर शिंदे, बापू यादव शिंदे, मच्छिंद्र शंकर धनगर, अंबू बापू शिंदे, बापू तात्या शिंदे, नारायण अंबू धनगर, गोरख नाथा धनगर, तायगा बापू धनगर, संतोष मच्छिंद्र धनगर, राजू ऊर्फ तात्या मारुती धनगर (रा. वैदूवाडी, सावेडी, नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत संजय धनगर (रा. निर्मलनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की वैदू समाजाची मढी (ता. पाथर्डी) येथे 21 फेब्रुवारी 2016 रोजी होणारी जातपंचायत रद्द करावी, यासाठी मी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यामुळे या पंचांनी वैदूवाडी (सावेडी) येथे जातपंचायत घेत पत्नी, दोन मुलांसह मला जातीबाहेर काढल्याचे जाहीर केले. एका नातेवाइकाचा 22 एप्रिल 2016 रोजी धार्मिक कार्यक्रम होता. त्यासाठी कुटुंबासह तेथे गेलो असता, पंचांनी मला सहभागी होऊ दिले नाही.

याबाबत जाब विचारला असता, "तुला जातीबाहेर काढल्यामुळे कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. तू सहभागी झाल्यास हातपाय मोडू,' असे म्हणून तेथून हाकलून दिले.

याबाबत मध्यंतरी बाबू धनगर, बापू धनगर, मच्छिंद्र धनगर (रा. वैदूवाडी) यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, 10 नोव्हेंबर 2016 रोजी या पंचांनी जातपंचायत भरवून जातीबाहेर काढलेल्या लोकांकडून दोन लाख 74 हजार रुपये वसूल केले. पुन्हा जातीत घेण्यासाठी माझ्याकडे दोन लाखांची मागणी केली; मात्र त्यास नकार दिला असता "तुझ्या मुलांचे लग्न होऊ देणार नाही,' असे ते म्हणाले. लोकांकडून पैसे घेतल्याच्या नोंदी जातपंचायतीच्या नोंदवहीत आहेत.

Web Title: The complaint brought caste