सांगली पालिकेतील आठ नगरसेवकांविरोधात जिल्हा न्यायालयात तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मिरज - महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या मिरजेतील सहा, सांगली कुपवाडमधील प्रत्येकी एक अशा आठ नगरसेवकांचे पद रद्द करावे, या मागणीसाठी आज पराभूत उमेदवारांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. 

मिरज - महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या मिरजेतील सहा, सांगली कुपवाडमधील प्रत्येकी एक अशा आठ नगरसेवकांचे पद रद्द करावे, या मागणीसाठी आज पराभूत उमेदवारांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. 

वेगवेगळ्या सहा जणांनी काँग्रेसचे संजय मेंढे, हारुण शिकलगार, भाजपचे निरंजन आवटी, गणेश माळी, संगीता खोत, गायत्री कुल्लोळी आणि अनिता वनखंडे, राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते यांच्या निवडीला आव्हान देण्यासाठी विरोधकांनी सर्वतोपरी तयारी केली आहे. या प्रत्येक प्रकरणात अपात्र ठरवण्यामागची वेगवेगळी कारणे आहेत. या सर्वांविरोधात उमेदवारी अर्जांच्या छाननीवेळी आक्षेप घेतले होते. 

मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज वैध ठरवले. त्यानंतर आता ही न्यायालयीन लढाई नव्याने सुरू झाली आहे. यात मिरजेतील प्रभाग पाचमधील संजय मेंढे यांच्याविरुध्द तानाजी रुईकर यांनी उमेदवारी अर्जात टाकळी हद्दीतील स्थावर मालमत्तेची माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

प्रभाग चारचे नगरसेवक निरजंन आवटी यांनी मयुर मोरेश्‍वर कवठेकर या मतदारास धमकावल्याप्रकरणी आवटींविरूद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. या तक्रारीस अनुसरून आबा पाटील यांनी आवटींनी मतदारांना दमदाटी केल्याची तक्रार केली आहे. 

प्रभाग सातमध्ये माजी महापौर किशोर जामदार यांना पराभूत करून विजयी झालेले गणेश माळी यांच्याविरुध्द सुनील नांद्रे यांनी तक्रार दाखल केली. महिला नगरसेविकांमध्ये अनिता वनखंडे यांच्याविरुध्द शिवसेनेच्या श्‍वेता गवाणे यांनी धाव घेतली आहे. त्यांच्या तक्रारीत बेकायदा बांधकाम आणि अन्य बाबींचा उल्लेख आहे. तर संगीता खोत यांच्याविरुध्द विशाल कलगुटगी यांनी तक्रार दाखल केली. यामध्ये खोत एका मजुर सोसायटीसह जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालिका आहेत. त्या मजूर सोसायटीच्या नावे महापालिकेची अनेक कामे असल्याचे कलगुटगी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

प्रभाग सातमधून विजयी झालेल्या गायत्री कुल्लोळी यांच्याविरुध्द डॉ. विजय कोळेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये कुल्लोळी यांच्या पतीच्या नावे असलेल्या मालमत्तांचा उल्लेख उमेदवारी अर्जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. महापौर हारुण शिकलगार यांच्याविरोधात असिफ बावा यांनी तीन अपत्यांच्या मुद्यावर याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. शेडजी मोहिते यांच्याविरोधात अपक्ष उमेदवाराने धाव घेतली आहे. या सर्वच तक्रारींची शहनिशा करून प्राथमिक तथ्य आढळल्यास या याचिका म्हणून दाखल करवून घेतल्या जातील. 

कायदा काय सांगतो?
एखाद्या विजयी उमेदवाराबाबत आक्षेप असतील तर कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हा न्यायालयात धाव घेण्यासाठी निवडणूक निकालानंतर १० दिवसांची मुदत असते. उच्च न्यायालयात मात्र अशी मुदत नाही. महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत सदस्य अनहर्ता तरतुदीअंतर्गत दाद मागता येते. तथापि त्या मुद्यावर निवडणुकीआधी हरकत घेणे बंधणकारक आहे. यालाही काही अपवाद आहेत.

यापूर्वीही अशा स्वरुपाच्या काही याचिका दाखल झाल्या होत्या. जिल्हा न्यायालय ते उच्च न्यायालय या प्रवासात पाच वर्षाची मुदत संपली होती. आजही या याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. काहींना सभागृहातील मतदान प्रक्रियेस न्यायालयाने अपात्र ठरवले होते तर काहींना सभागृहात बोलण्यास मनाई केली होती.

Web Title: Complaint in District Court against eight corporators