डॉ. श्रीकांत सागावकरवर गुन्हा दाखल

डॉ. श्रीकांत सागावकरवर गुन्हा दाखल

कोल्हापूर - अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व्हिनस कॉर्नर येथील साई नर्सिंग होमच्या डॉक्‍टरवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो शाहूवाडी पोलिसांकडे वर्ग केला. डॉ. श्रीकांत दत्तात्रय सागावकर (वय ४३, रा. महाडिक वसाहत) असे अटक केलेल्या संशयित डॉक्‍टरचे नाव आहे. तसेच मुलीवर अत्याचार करून तिला गर्भपातासाठी प्रवृत्त करणाऱ्या एकास अटक केली आहे. सागर तुकाराम पाटील (वय २४) असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याचा वडील तुकाराम मारुती पाटील (वय ५०, दोघे रा. गिरगाव, ता. शाहूवाडी) हा पसार झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर ती गर्भवती झाली. तिला जबरदस्तीने शहरातील एका रुग्णालयात गर्भपातासाठी आणले आहे, अशी माहिती काल (ता. २३) शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने त्या मुलीचा शोध सुरू केला. यात व्हिनस कॉर्नर येथील एका रुग्णालयात ही मुलगी सायंकाळी पथकाला मिळून आली. पोलिसांनी तिची सुटका करून तिला  सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारानंतर तिच्या नातेवाइकांनी मध्यरात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

गिरगाव (ता. शाहूवाडी) येथील संशयित सागर पाटील हा सहा महिन्यांपासून एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करत होता. त्यातच ती मुलगी पाच महिन्यांची गर्भवती झाली. हा प्रकार घरच्यांना समजून गावात आपली बदनामी होईल, या भीतीने सागर व त्याचे वडील तुकाराम हे दोघे त्या मुलीला घेऊन शुक्रवारी (ता. २२) कोल्हापुरात घेऊन आले. व्हिनस कॉर्नर येथे वसंतऋतू प्लाझा आहे. याच्या दुसऱ्या मजल्यावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत सागावकरचे श्री साई नर्सिंग होम नावाचे हॉस्पिटल आहे. येथे तिला त्याच दिवशी गर्भपात करण्यासाठी दाखल केले.

डॉ. सागावकरने त्या मुलीला काल (ता. २३) गर्भपाताची गोळी देऊन तिचा बेकायदा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला, असे पीडितेच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयित डॉ. सागावकरसह सागर पाटील व तुकाराम पाटील यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो शाहूवाडी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला.

संबंधित डॉ. सागावकरला कालच शाहूपुरी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला आज शाहूवाडी पोलिसांच्या स्वाधिन केले. याप्रकरणी संशयितावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बेकायदा कृत्याची माहिती शासकीय पोलिसांपासून दडवणे आणि गर्भपातास प्रवृत्त करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. दरम्यान, दुपारी पीडित मुलीचा सीपीआरमध्ये गर्भपात झाला. त्यानुसार तिचा जबाब नोंदविण्याचे काम शाहूवाडी पोलिसांकडून सुरू होते. ताब्यात घेतलेल्या डॉ. सागावकरसह सागर पाटील याला अटक केल्याचे पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे यांनी सांगितले.

इमारतीत शांतता
संशयित डॉक्‍टर सागावकरवर गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या श्री साई नर्सिंग होमच्या इमारतीत आज कमालीची शांतता होती. माहिती विचारण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्‍नावर येथील नागरिकांनी मौन बाळगले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com