श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्यावर गुन्हा दाखल

vitthal rukmini
vitthal rukmini

पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झटपट दर्शन घडवण्यासाठी भाविकाकडून पैसे घेणाऱ्या एका एजंटावर पोलिसांनी शुक्रवारी (ता. 31) गुन्हा दाखल केला होता. त्याच्याकडे चौकशी केल्यावर या प्रकरणात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य सचिन अधटराव सामील असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अधटराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला आज (शनिवार) सायंकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान आज या प्रकरणातील आरोपी कैलास डोके आणि विजय देवमारे या दोघांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 3 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी संबंधित काही जणांना हाताशी धरुन पैसे घेऊन दर्शनाचा काळाबाजार करण्याचा उद्योग काही जण करत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. मध्यंतरी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. परंतु, त्या नंतर देखील संबंधित एजंटांचा उद्योग उघडपणे सुरु होता. भाविकांकडून पैसे घेऊन ते व्हीआयपी भाविक असल्याचे भासवून त्यांना झटपट दर्शन घडवण्याचा धंदा तेजीत चालला होता. अनेकजण त्यामध्ये सामील होते. दररोज अशा पध्दतीने पैसे घेऊन संबंधित एजंट हजारो रुपये मिळवत असल्याची चर्चा होत होती.

शुक्रवारी (ता. 31) लक्ष्मी श्रीनिवासराव पीठे आणि त्यांचे पती श्रीनिवासराव प्रसादराव पीठे (रा. हैद्राबाद) हे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी आरोपी कैलास डोके याने त्यांच्याकडून प्रत्येकी चारशे रुपये घेऊन दर्शन घडवण्याचे आमिष दाखवले. पीठे यांनी दोघांचे मिळून आठशे रुपये कैलास डोके याला दिल्यावर त्याने मंदिर समितीच्या एका सदस्यास फोन करुन दर्शन पासची व्यवस्था केली. त्यानंतर डोके हा पास घेऊन पीठे दांम्पत्यास दर्शनासाठी घेऊन जात असताना मंदिर सुरक्षेचे काम करणाऱ्या पोलिस नाईकवामन पोपट यलमार यांना संशय आला. त्यांनी पीठे यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांना डोके हा पैसे घेऊन दर्शनास जात असल्याची माहिती पुढे आल्याने त्यांनी डोके याच्या विरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे व पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना विचारले असता ते म्हणाले, या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी कैलास डोके आणि विजय देवमारे यांच्याकडे चौकशी केल्यावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य सचिन अधटराव हे सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून, त्यांच्यावर ही गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडे चौकशी करुन पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com