स्पर्धा परीक्षा पुस्तक घर अन्‌ अँपी थिएटर!

रविकांत बेलोशे
शुक्रवार, 4 मे 2018

पुस्तकांच्या गावात नव्याने रुजू होत असलेल "अँपी थिएटर' हे सांस्कृतिक परंपरेला समृद्ध करण्यासाठी आकर्षण ठरणार आहे.

भिलार - भिलार "पुस्तकांचं गाव' एक वर्षाच झालं!...वर्षपूर्तीनंतर अँपी थिएटर, स्पर्धा परीक्षा पुस्तक घर, नाट्यपुस्तके घर आणि चित्रकलाविषयक दालन होणार असल्याने हे गाव भविष्यात साहित्य संस्कृतीचे डेस्टिनेशन होणार आहे. 

वर्षभरात विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी भिलारची तांबडी माती अक्षरशः न्हाऊन निघाली. स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे गाव "पुस्तकांचं गाव' या बिरुदाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले. पाहता पाहता या गावात वाचक आणि पर्यटकांची रेलचेल वाढून गावाचे रुपडं केव्हा आणि कस पालटून गेले हे समजलही नाही. आज वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुस्तकांचं गाव सर्वच दृष्टीने आणखी समृद्ध होत आहे.
 
दुसऱ्या वर्षात नव्या संकल्पना आणि नवे संकल्प घेऊन पुढे चालू असलेली वाटचाल साहित्य संस्कृती आणखी दृढ करणारी ठरणार आहे. नवी दालने (घरे) उघडताना अभ्यासात्मक आणि कलात्मकतेवर भर दिला आहे. त्यामुळे साहित्यिक वाचकांबरोबरच आता अभ्यासू युवक आणि कलात्मक हातही या गावाकडे आकर्षित होणार आहेत. 

नव्या दालनामध्ये स्पर्धा परीक्षांचे 700 ते 800 पुस्तके असणारे एक घर आता अभ्यासू मुलांचे आकर्षण ठरणार आहे. त्याचपद्धतीने कलात्मक बाज निर्माण करणाऱ्या एक घरात चित्रकलेची पुस्तके असतील. त्याठिकाणी चित्रकला रसिकांच्या उड्या पडणार आहेत. दुसऱ्या दालनातील नाटक विभाग नाट्यरसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे.

अडीचशे रसिक बसतील असे खुले प्रेक्षागृह 
पुस्तकांच्या गावात नव्याने रुजू होत असलेल "अँपी थिएटर' हे सांस्कृतिक परंपरेला समृद्ध करण्यासाठी आकर्षण ठरणार आहे. गावाने दिलेल्या जमिनीवर श्रीराम मंदिरानजीक निसर्गाच्या सान्निध्यात सुमारे अडीचशे रसिक बसतील, असे खुले प्रेक्षागृह (अँपी थिएटर) तयार झाले आहे. याचे उद्‌घाटन आज आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, प्रशिक्षण, एकांकिका, नाट्यप्रवेश, सांगितिक मैफली, कार्यशाळा, एकपात्री प्रयोग असे कार्यक्रम याठिकाणी होणार आहेत.

Web Title: comptative exam books and ampi theater