चिंचणेर वंदनमधील स्थिती नियंत्रणात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

सातारा - चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथील नवविवाहितेचा खून उघडकीस आल्यानंतर संतप्त झालेल्या युवकांनी काल रात्री साडेदहाच्या सुमारास गावातील वीज घालवून एका वस्तीवर हल्ला केला. दगडफेक करत 35 ते 40 घरांची मोडतोड केली. दुचाकी व चारचाकी गाड्या, सायकल अशी सुमारे 20 वाहने जाळली. पोलिसांनी रात्रीत धरपकड करून दोन अल्पवयीन मुलांसह 31 जणांना अटक केली. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सातारा - चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथील नवविवाहितेचा खून उघडकीस आल्यानंतर संतप्त झालेल्या युवकांनी काल रात्री साडेदहाच्या सुमारास गावातील वीज घालवून एका वस्तीवर हल्ला केला. दगडफेक करत 35 ते 40 घरांची मोडतोड केली. दुचाकी व चारचाकी गाड्या, सायकल अशी सुमारे 20 वाहने जाळली. पोलिसांनी रात्रीत धरपकड करून दोन अल्पवयीन मुलांसह 31 जणांना अटक केली. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. घटनास्थळी तातडीने पोचण्यापासून संशयितांना पकडण्यापर्यंत, तसेच विविध संघटनांशी संवादाची भूमिका पोलिस अधीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने योग्य पद्धतीने निभावल्यामुळे तणावानंतरची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले.

दरम्यान, नवविवाहिता अरुणा दत्तात्रेय मोहिते (वय 21) यांच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या सिद्धार्थ ऊर्फ बारक्‍या दयानंद दणाणे याला 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या नातेवाइकांना दुसरीकडे हलविण्यात आले आहे. सायंकाळी अरुणावर सासरी बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथील अरुणा बर्गे हिचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. 29 डिसेंबर रोजी सिद्धार्थने तिला साताऱ्यात भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार ती 30 डिसेंबरला साताऱ्यात आली. तेव्हापासून ती बेपत्ता होती. काल तिचा मृतदेह ठोसेघर येथे आढळून आला. सिद्धार्थने तिच्या खुनाची कबुली दिली.

हे वृत्त समजल्यावर काल दुपारीच नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. त्यांनी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. त्यानुसार मृतदेह काल रात्री पोलिस बंदोबस्तात ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. त्यानंतर उर्वरित नातेवाइक व ग्रामस्थ गावात गेले.

अरुणाचा निर्घृण खून केल्यामुळे त्यांच्यात संतापाची लाट होती. रात्री साडेदहाच्या सुमारास गावात युवकांचा मोठा जमाव जमला. याबाबत गावात तैनात असलेल्या पोलिसांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्याच वेळी गावातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जमावाच्या हालचाली पोलिसांच्या नजरेत आल्या नाहीत. अंधारामध्ये अचानकपणे सिद्धार्थ राहत असलेल्या वस्तीमध्ये दगडफेक आणि आरडाओरडा सुरू झाली. पोलिस तेथे गेले. मात्र, जमलेल्या मोठ्या जमावापुढे त्यांचे काही चालले नाही. जमावाने वस्तीमधील घरांवर मोठी दगडफेक करत तोडफोड केली. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दुचाकी व चार चाकी गाड्या पेटवून दिल्या. काहींनी दणाणे राहत असलेल्या घरावर हल्ला केला. घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. काहींनी छताचा पत्रा उचकटून टाकला, तसेच घरातील सर्व वस्तूंची मोडतोड केली. समाज मंदिरातील साहित्याचीही मोडतोड केली.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दणाणे याच्या कुटुंबीयांसह वस्तीमधील इतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती पसरली. त्यांनी स्वतःला सुरक्षितपणे घरातील खोल्यांमध्ये कोंडून घेतले होते. दहा ते पंधरा मिनिटांत संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली होती. तोपर्यंत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणावर फौजफाटा वस्तीमध्ये दाखल झाला. स्वतः श्री. पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक खंडेराव धरणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, पद्माकर घनवट, रवींद्र पिसाळ, निरीक्षक नाळे व इतर अधिकारीही घटनास्थळी हजर झाले.

तोपर्यंत गोंधळ करणारा जमाव पांगला होता. पोलिसांनी वीज कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावातील वीजपुरवठा सुरळीत केला. अग्निशामक बंब बोलावून आग विझविण्यात आली.

झालेल्या प्रकाराने दणाणे यांच्या कुटुंबीयांसह परिसरातील सर्व महिला, पुरुष, मुले हादरून गेले होते. अधीक्षक पाटील यांनी संवाद साधत सर्वांना आधार दिला. भारिपचे चंद्रकांत खंडाईत व अन्य कार्यकर्तेही तेथे उपस्थित होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व इतर पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली. पहाटेपर्यंत श्री. पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी गावात ठाण मांडून होते. सकाळपर्यंत पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह 33 जणांना ताब्यात घेतले. 31 जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

साताऱ्यात काही काळ "बंद'
आज सकाळी दलित संघटनांतील काही युवकांनी साताऱ्यातील मुख्य बस स्थानकावर बस बंद करण्यासाठी गोंधळ केला, तसेच "सातारा बंद' करण्याचे आवाहन करत शहरातून रॅली काढली. मात्र, शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ते शांत झाले. मात्र, त्यामुळे शहरातील काही शाळा लवकर सोडून देण्यात आल्या, तसेच काही दुकानेही बंद राहिली. एसटी बस काही वेळाने सुरू झाल्या. दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाने जाऊन अधीक्षक पाटील, तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. या वेळी श्री. खंडाईत, अशोक गायकवाड, रामदास कांबळे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे दादासाहेब ओव्हाळ, संदीप कांबळे, आनंद थोरवडे, सतीश गाडे, प्रशांत चव्हाण आदीनींही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. पोलिसांनी तातडीने उचललेली कठोर पावले, नागरिक व संघटनांशी राखलेला संवाद व संघटनांच्या संयमाच्या भूमिकेमुळे चिंचणेर घटनेमुळे निर्माण झालेला तणाव दुपारपर्यंत निवळला होता.

Web Title: condition control in chinchner vandan