माझा वारणेचा वाघ गेला....

माझा वारणेचा वाघ गेला....

सांगली - पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात शहीद झालेले दुधगाव (ता. मिरज) येथील जवान नितीन कोळी यांच्यावर लष्करी इतमामात सोमवारी (ता. 31) अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन यांच्या पार्थिवाला अग्नी देताच त्यांच्या पत्नी संपदा यांनी माझा वारणेचा वाघ गेला... अशा शब्दांत टाहो फोडला आणि वारणाकाठ हळहळला. या वेळी शहीद जवान नितीन कोळी अमर रहे...जब तक चॉंद सूरज रहेगा नितीन तेरा नाम रहेगा... भारत माता की जय... देश का बेटा कैसा हो...नितीन कोळी जैसा हो...अशा घोषणांनी परिसर गहिवरला होता. लाखोंच्या जनसमुदायाने साश्रुपूर्ण नयनांनी शहीद नितीनला अखेरचा सलाम केला.

सीमा सुरक्षा दलात भरती झालेले जवान नितीन कोळी शुक्रवारी (ता. 28) रात्री जम्मू-काश्‍मीर सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात शहीद झाले. त्यांचे पार्थिव विमानाने दिल्ली, तेथून पुणे येथे आणण्यात आले. रविवारी (ता. 30) रात्री पुण्याहून इस्लामपूर येथे शासकीय विश्रामगृहावर पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर सोमवारी सकाळी सहा वाजता दुधगाव येथे नितीन कोळी यांच्या घरी आणले. त्या वेळी वडील सुभाष, आई सुमन, पत्नी संपदा, बंधू उल्हास, नितीन यांची लहान मुले देवराज व युवराज यांनी अंत्यदर्शन घेतले. पंचक्रोशीतील नागरिकांनी अंत्यदर्शनाला गर्दी केली होती. कर्मवीर चौकातून सकाळी 9 वाजता सजवलेल्या ट्रॅक्‍टरवरुन गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. संपूर्ण पंचक्रोशी दुःखसागरात बुडाली होती.

दुधगावसह पंचक्रोशीतून आलेले ग्रामस्थ सकाळी सातपासूनच वारणाकाठी थांबून होते. अंत्ययात्रा सुरू झाल्यानंतर प्रत्येक टेरेसवरुन पार्थिवावर ग्रामस्थ पुष्ववृष्टी करत होते. तर अंत्ययात्रा सुरू झाल्यापासून मानवी साखळी करुन हातात हात घालून कडे करण्यात आले. अंत्ययात्रा जवळ आल्यानंतर भारत माता की जय..असा हुंकार दुतर्फा ऐकू येत होता. हे अनुभवताना अंगावरील शहारे कमी होत नव्हते.

या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, राजू शेट्टी, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, जयंत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. या वेळी विलासराव शिंदे, नितीन शिंदे, मिरज प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, निवासी नायब तहसीलदार शेखर परब, सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक चंदनशिवे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त), सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रणजितसिंह सूर्यवंशी, दुधगावच्या सरपंच सुरेखा आडमुठे यांच्यासह अनेक मान्यवर शहीद नितीन कोळी यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.

या वेळी सीमा सुरक्षा दल आणि जिल्हा पोलिस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. तसेच बिगुलवर शोकधून वाजवण्यात आली. पुत्र देवराज आणि बंधू उल्हास यांनी पार्थिवास अग्नी दिला. या वेळी अवघा वारणाकाठ या लाडक्‍या वीराला पंचत्वात विलीन होताना गहिरवला. भारत माता की जय या घोषणेने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर उपस्थित शहीद नितीनच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गोळा झाले.

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक गैरहजर
जिल्ह्यातील जवान सीमेवर लढताना शहीद झाल्यावर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. शिवाय शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक या जिल्ह्याच्या प्रमुखांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आणि जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे हे दोघेही अंत्यसंस्कारप्रसंगी गैरहजर होते. याबाबत जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

अवघा गाव एकची झाला..
वारणेच्या काठावर वसलेले दुधगाव. गावातील अनेक तरुण लष्करात भरती. दिवाळीची लगबग सुरू असताना गावचा सुपुत्र नितीन कोळी शहीद झाल्याची बातमी आली. अन्‌ रोषणाई करणारे हात थबकले, घरावर लावण्यात आलेले आकाशकंदील काढण्यात आले. ऐन दिवाळीत गावावर सुतकी कळा आली. नितीनच्या जाण्याने देशप्रेम आणि पाकिस्तान विरुद्धच्या संतापाच्या भावनेने अवघा गाव एक झाला. आपल्या "रियल हिरो'च्या अंतिम स्वागतासाठी जणू अहमहमिका लागली. कोणाला काही सांगावे लागत नव्हते. चेहऱ्यावर गांभीर्य होते. वातावरणात सुन्नपणा होता. हजारो हात कामाला लागले. गावाच्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खराब होता. मात्र हजारो हात राबू लागले अन्‌ चोवीस तासांत रस्ता मुरुम टाकून तयार करण्यात आला.

राष्ट्रध्वज नितीनच्या कुटुंबाकडे सुपूर्त
ज्या राष्ट्रध्वजातून नितीन कोळी यांचे पार्थिव आणले होते, तो त्यांचे पिता सुभाष यांच्याकडे सैन्यदलाच्या वतीने देशाचा गौरव, सन्मान आणि नितीनच्या स्मृती म्हणून प्रदान करण्यात आला.

माझा मुलगा देशाला अर्पण केला..
वीरपिता सुभाष कोळी यांनी "मुलगा देशाला अर्पण केला' अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

पाडव्यादिवशी पतीला अखेरचा निरोप
दिवाळी पाडवा म्हणजे खरेतर पत्नीने पतीला औक्षण करून अखंड सौभाग्याचं लेणं मागण्याचा दिवस. मात्र याच दिवशी मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या आपल्या वीरपतीला अखेरचा निरोप देण्याची वेळ शहीद नितीनच्या पत्नीवर आली.

वीरपत्नीला शासकीय सेवेत घेण्याचा प्रयत्न करू - पालकमंत्री
शहीद नितीन यांची पत्नी संपदा यांना शासकीय सेवेत घेण्यासाठी आपण प्रयत्न करू. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारच्या वतीने करण्यात येईल, असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. वारणा नदीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलास शहीद नितीन कोळी यांचे नाव देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

भाजपतर्फे पाच लाखांची मदत
शहीद नितीन कोळी यांच्या कुटुंबीयांना सांगली भाजपतर्फे पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. तर राज्य शासनाच्या वतीने पंधरा लाखांची मदत देण्यात येणार आहे.

घराघरांतून तूप आले
शहीद नितीन कोळी यांची अंत्ययात्रा फुलांनी सजवलेल्या वाहनातून काढण्यात आली. घराघरांतून अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात तूप संकलित केले होते. त्याशिवाय सुक्‍या खोबऱ्याचे संकलनही करण्यात आले होते.

लष्करात रुजू झाल्यानंतर नितीन यांनी दोन वर्षापूर्वी घर बांधले आहे. मात्र, या घरात राहण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. नव्या घरात नांदायला सुध्दा त्याला देवाने संधी दिली नाही, अशी अश्रूपूर्ण प्रतिक्रिया एका वृध्द महिलेने व्यक्त केली. आसपासच्या खोची, सावळवाडी येथूनही शेकडो महिला, पुरुष, तरुण वारणा नदीच्या पश्‍चिम किनाऱ्याला उपस्थित होते. शहीद नितीन कोळी अमर रहे यासह पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा सुरू होत्या.

रांगोळी पाडव्याची नाही..श्रध्दांजलीची
दीपावली पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. या दिवशी घराघरासमोर रांगोळ्या काढून उत्सव साजरा केला जातो. पण दुधगावात रांगोळ्या काढल्या गेल्या.. तसेच चौकाचौकांत श्रध्दांजलीचे बॅनर लावण्यात आले होते.

लाडक्‍या "हिरो'साठी
आपल्या "हिरो'च्या अंतिम स्वागतासाठी. प्रत्येक रस्ते अन्‌ रस्ते स्वच्छ करुन त्यावर पाकळ्यांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या. गावातील एकही रस्ता असा नव्हता, की तिथे फुले अंथरली गेली नाहीत. एकही समाज नव्हता जो यात सामील झाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी हवी तेवढी फुले घेऊन जा, असे सांगत फुलांचे प्लॉट खुले करून दिले. अंत्यसंस्कारप्रसंगी उणिवा राहू नयेत यासाठी प्रत्येक जण झटत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com