पंचायत समितीत सत्तेसाठी रंगणार घोडेबाजार

- विकास कांबळे
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेप्रमाणे काही ठिकाणच्या पंचायत समित्या अधांतरीच राहिल्या आहेत. मतदारांनी स्पष्ट कौल न दिल्यामुळे जिल्ह्यातील कागल, राधानगरी व चंदगड पंचायत समितीमध्ये समान सदस्य निवडून आले आहेत. यापैकी ज्या ठिकाणी टोकाची ईर्षा आहे, त्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडीत घोडेबाजार होण्याची शक्‍यता आहे. मात्र ज्या ठिकाणी टोकाची ईर्षा नाही, त्या पंचायत समितीमध्ये कालावधी वाटून किंवा नशिबावर हवाला ठेवून चिठ्ठ्यांवर सभापतिपदाचा निर्णय घेण्यावर एकमत होईल.

भारतीय जनता पक्षाने दोन्ही काँग्रेसमध्ये केलेली फोडाफोडी, स्थानिक पातळीवर केलेल्या आघाड्या यामुळे कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती विचित्र झाली आहे. पंचायत समितीमध्ये तर त्याहून अधिक बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी टोकाची राजकीय ईर्षा आणि चुरस आहे त्या ठिकाणी सभापतिपदाच्या निवडीत अपक्षांना लाखमोलाचा भाव येणार आहे. 
कागल पंचायत समितीत गटातटात टोकाची ईर्षा आणि चुरस असते. या पंचायत समितीमध्ये सदस्यांची संख्या १० आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत. सध्या राष्ट्रवादी व शिवसेना म्हणण्यापेक्षा मुश्रीफ आणि मंडलिक गटात प्रचंड चुरस या तालुक्‍यात आहे. प्रा. संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून निसटता पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे या ठिकाणी सभापतिपदासाठी घोडेबाजार होण्याची शक्‍यता आहे. तशीच परिस्थिती चंदगडमध्ये निर्माण झाली आहे. 

चंदगडमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कुपेकर गटाने आघाडी केली आहे. त्यांना चार जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत. एक अपक्ष आल्यामुळे त्याला चांगलाच भाव येणार आहे.
शिरोळ पंचायत समितीमध्ये सर्वांत अधिक ४ जागा स्वाभिमानीला मिळाल्या असल्या तरी बहुमतासाठी आणखी तीन जागा त्यांना हव्या आहेत. भाजप १, शिवसेनेच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. त्यांची बेरीज केली तर संख्या ७ होते. बहुमतासाठी ८ सदस्यांची आवश्‍यकता आहे. दुसरीकडे काँग्रेस ३, राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. १ अपक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी एक झाले तरी त्यांनाही एका मताची आवश्‍यकता आहे.

त्यामुळे अपक्षाचा भाव चांगला वधारणार आहे. येथे स्वाभिमानीला जर आपली सत्ता टिकवायची असेल तर त्यांना भाजपला सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही. भाजपलाही हातकणंगले, गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये स्वाभिमानीची मदत घ्यावी लागणार आहे. कारण या ठिकाणी बहुमतासाठी एक मत कमी पडत आहे आणि तेथे स्वाभिमानीचे सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे पंचायत समितीच्या राजकारणात स्वाभिमानीला भाजपची आणि भाजपला स्वाभिमानीची साथ घेतल्याशिवाय पर्याय दिसत नाही.

Web Title: confussion for panchyat committee power