'मोदींची हुकूमशाही चालू देणार नाही'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - नोटा बदलण्याच्या निर्णयामुळे लोकांना होणारा त्रास केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कॉंग्रेसतर्फे दसरा चौकात जनआक्रोश आंदोलन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही चालू देणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी दिला. आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सुमारे दोन तास दसरा चौक दणाणून सोडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे व हजारच्या नोटा बाजारातून मागे घेतल्यानंतर जनतेची दैना उडाली आहे. स्वतःचे पैसे असताना ते मिळेनासे झाल्याने हातावर पोट असणाऱ्या, रोजगारी, छोटे व्यापारी, फेरीवाले, हातगाडीवाले, शेतकरी, शेतमजूर, अन्य क्षेत्रांतील मजुरांची फरफट होत आहे. रोजचा खेळता पैसा हातात नसल्याने जगणेही कठीण झाले आहे. मध्यमवर्गीय पैशासाठी बॅंकेसमोर रांगा लावताहेत. पैशासाठी अनेकांचा बळीही गेला आहे.

सर्वसामान्यांची दैना होत असूनही केंद्र आणि राज्य सरकारवर काहीही परिणाम होत नाही. जिल्हा बॅंकांना हेतूपुरस्सर पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. लोकांना नेमका काय त्रास होतो आहे, याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कॉंग्रेसतर्फे आज देशभरात आक्रोश आंदोलन झाले.

दसरा चौकात सकाळी साडेअकरानंतर आंदोलनाला सुरवात झाली. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आजी-माजी पदाधिकारी तसेच अन्य सेलचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दसरा चौकात मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. जनतेचा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. आंदोलना वेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनामुळे या परिसरात वाहतुकीची काही काळ कोंडी झाली.
आंदोलनात जि. प. अध्यक्षा विमल पाटील, माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, दिनकरराव जाधव, माजी महापौर अश्‍विनी रामाणे, सुरेश कुराडे, एस. के. माळी, बाळासाहेब खाडे, हिंदुराव चौगुले, अनिल यादव, सुभाष इनामदार, बजरंग पाटील, भगवान जाधव, शंकर पाटील, जयसिंगराव हिर्डेकर, शामराव देसाई, अभिजित तायशेटे, सचिन चव्हाण, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ. संध्या घोटणे, उदयानी साळोखे आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Congress against notabandi