कॉंग्रेस व राष्ट्रवादी "साथ साथ'  - हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पक्षांतर्गत कायद्यानुसार आम्ही या सात जणांवर कारवाई करणार आहोत. त्याचप्रमाणे या कायद्यानुसार त्यांचे पद रद्द करण्याकरिता न्यायालयातही दाद मागणार आहे. जोपर्यंत त्यांचे पद रद्द होत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील. त्या ठिकाणी नव्याने निवडणुका घेण्यास आम्ही भाग पाडू. 
- हसन मुश्रीफ, आमदार 

कोल्हापूर - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आघाडी करण्याचे अधिकार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीने दिले आहे. त्यामुळे कोल्हापुरात कॉंग्रेससोबत आमची आघाडी होऊ शकते. जातीयवादी पक्षाशी मात्र राष्ट्रवादी आघाडी करणार नाही, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. पक्षाचा व्हिप धुडकावून भाजपसोबत गेलेल्या अशोक जांभळे यांच्यासह सात जणांचे पद रद्द करण्यासाठी पक्षातर्फे प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, ""जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी सुरू आहे. काही लोक पक्ष सोडून चालले आहेत. ते पक्षावर नाराज होऊन चाललेले नाहीत, तर सत्तेसोबत राहण्याची त्यांना सवय असल्यामुळे ते लोक चालले आहेत. जे लोक जातील, त्यांचा फारसा विचार करणार नाही. पक्षाबाबत नाराजी असती, त्यांनी बोलून दाखविले असते तर त्यातून मार्ग काढता आला असता. सत्तेसाठी जे लोक जाणार आहेत, त्यांना आपण काय सांगणार? आता जे कार्यकर्ते आहेत ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या जीवावरच यावेळच्या निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेस निश्‍चितपणे जिल्हा परिषदेत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. गेल्या आठवड्यामध्ये पुणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. या निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी करण्याबाबतही चर्चा झाली. आघाडी करण्यासंदर्भात जिल्हा नेतृत्वाला अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून स्थानिक नेत्यांनी त्याठिकाणी निर्णय घ्यावेत, पण जातीयवादी पक्षाशी मात्र कोठेही आघाडी न करण्याचे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे आमचा नैसर्गिक मित्र असणारा कॉंग्रस पक्षासोबत आम्ही याठिकाणी आघाडी करू शकतो. त्यासंदर्भात कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांशी अद्याप अधिकृत चर्चा झालेली नाही. मात्र त्या त्या मतदारसंघातील परिस्थिती पाहून हे निर्णय घेतले जातील. 

इचलकरंजीचे अशोक जांभळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना आम्ही व्हिप काढला होता. कॉंग्रेससोबत राहण्याची भूमिका पक्षाने घेतली होती. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हा नेतृत्वाला कोणतीही कल्पना न देता परस्पर भारतीय जनता पक्षाला सत्तेसाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजल्यानंतर आम्ही व्हिप काढला; पण हा व्हिप अशोक जांभळे आणि मंडळीने फाडून टाकला. हे योग्य नाही.'' 

Web Title: Congress and the NCP as well - Hasan Mushrif