कर्जतमधून रोहित पवार यांच्या उमेदवारीवर नवे संकट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

२००९ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे केशवराव देशमुख यांनी उमेदवारी केली होती. त्या वेळी ३२ हजार ६७३ मते मिळवून ते दोन नंबरवर राहिले. भाजपचे राम शिंदे विजयी झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून किरण पाटील यांनी निवडणूक लढविली. त्यांना सुमारे नऊ हजार मते मिळाली होती. राष्ट्रवादीकडून राजेंद्र फाळके यांनी उमेदवारी केली होती.

नगर : रोहित पवार इच्छुक असल्यामुळे राज्याचे लक्ष वेधलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. ही जागा काँग्रेसकडेच होती व ती पुढेही काँग्रेस सोडणार नाही, असे स्पष्ट करून नूतन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

दोन वर्षांपासून रोहित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात येत आहेत. दुष्काळग्रस्तांना मदत, प्रश्न सोडविण्यासाठी ते स्वतः थांबून प्रयत्न करीत आहेत. या मतदारसंघातून लढण्यासाठीचा अर्जही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाठविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांनीही या जागेवर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एकूणच ही जागा राष्ट्रवादीला मिळेल, अशा शक्यतेने ही प्रक्रिया होत आहे. परंतु नूतन जिल्हाध्यक्ष साळुंके हे कर्जतचे आहेत.

आघाडीत जागा वाटपात ७-५ असा पॅटर्न ठरलेला आहे. त्यानुसार काँग्रेसच्या वाट्याच्या सात जागांपैकी उत्तरेत पाच व दक्षिणेत दोन जागा काँग्रेसला मिळणे अपेक्षित आहे. यापूर्वी श्रीगोंदे व कर्जत-जामखेड या मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार दिले आहेत. मागील (२०१४) च्या निवडणुकीत मात्र श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीला सोडून तेथून आमदार राहुल जगताप निवडून आले. त्यामुळे या वेळीही ही जागा राष्ट्रवादीलाच मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मदार आता कर्जत-जामखेड मतदारसंघावरच आहे.

२००९ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे केशवराव देशमुख यांनी उमेदवारी केली होती. त्या वेळी ३२ हजार ६७३ मते मिळवून ते दोन नंबरवर राहिले. भाजपचे राम शिंदे विजयी झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून किरण पाटील यांनी निवडणूक लढविली. त्यांना सुमारे नऊ हजार मते मिळाली होती. राष्ट्रवादीकडून राजेंद्र फाळके यांनी उमेदवारी केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress claim on Karjat Jamkhed seat Rohit Pawar may be contest on this seat