काँग्रेसच्या प्रवीण निकाळजेंचे नगरसेवकपद रद्दचा प्रस्ताव

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 10 जुलै 2018

अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी श्री. निकाळजे यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासमोर या संदर्भातील सुनावणी झाली. त्याचा अहवाल श्री. मायकलवार यांनी आयुक्तांकडे पाठविला.

सोलापूर : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस आयुक्तांनी सर्वसाधारण सभेकडे केली आहे.  16 जुलैच्या होणारा निर्णय त्यांचे भवितव्य ठरविणार आहे.

अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी श्री. निकाळजे यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासमोर या संदर्भातील सुनावणी झाली. त्याचा अहवाल श्री. मायकलवार यांनी आयुक्तांकडे पाठविला. सुनावणीचा अहवाल पाहता श्री. निकाळजे यांनी बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध होते व त्यामुळे ते महापालिकेचे सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरतात. त्यानुसार पालिका अधिनियातील तरतुदीनुसार संपूर्ण अहवाल दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) यांच्याकडे पाठविण्यासाठी महापालिका सभेने मान्यता द्यावी, असा प्रस्ताव आयुक्तांनी सभेकडे पाठविला आहे. 

अवैध बांधकाम प्रकरणी श्री. निकाळजे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस आयुक्तांनी एप्रिलमध्ये सभेकडे केली होती. मात्र, हा विषय कधी घ्यायचा याचा निर्णय भाजपश्रेष्ठींशी चर्चा करून घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या सभेच्या मूळ विषयपत्रिकेवर हा विषय नव्हता. 90 दिवसांच्या आत प्रशासकीय प्रस्तावावर निर्णय न घेतल्यास तो आपोआप मंजूर होता अशी तरतूद आहे. या प्रस्तावाला 90 दिवस होत आल्याने, तो विषय अजेंड्यावर घेण्यात आला नसता तर प्रशासनाचा प्रस्ताव आपोआप मंजूर झाला असता व श्री. निकाळजे यांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव न्यायालयाकडे गेला असता. आता अजेंड्यावर विषय आल्याने सभेत काय निर्णय होतो, त्यावर श्री. निकाळजे यांचे भवितव्य ठरणार आहे.

Web Title: Congress Corporater Pravin Nikalje in Solapur municipal corporation