"फोटोछाप' पदाधिकाऱ्यांमुळे कॉंग्रेस अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पद मिळाले की दुसऱ्यांना संधी द्यायचीच नाही, अशा प्रवृत्तीच्या लोकांची नियुक्ती झाल्याने कॉंग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते दुरावले आहेत. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या फोटोछाप पदाधिकार्यामुळे कॉंग्रेस अडचणीत आला आहे, हे श्रेष्ठींनी ध्यानात घेण्याची गरज आहे, अशी चर्चा कॉंग्रेस भवन परिसरात सुरु झाली आहे.

सोलापूर : पद मिळाले की दुसऱ्यांना संधी द्यायचीच नाही, अशा प्रवृत्तीच्या लोकांची नियुक्ती झाल्याने कॉंग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते दुरावले आहेत. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या फोटोछाप पदाधिकार्यामुळे कॉंग्रेस अडचणीत आला आहे, हे श्रेष्ठींनी ध्यानात घेण्याची गरज आहे, अशी चर्चा कॉंग्रेस भवन परिसरात सुरु झाली आहे.

कॉंग्रेस भवनात कोणताही कार्यक्रम असो, जयंती, पुण्यतिथी अथवा सामाजिक उपक्रम ठराविक चेहरे ठरलेले. इतर कोणालाही संधीच नाही. स्वतःचा फोटो "पेपरात' येण्यासाठी सर्वांना बाजूला सारण्यातही या "चेहऱ्यां'ना काही वाटत नाही. आपण फार जबाबदारीचे काम करीत आहोत अशा थाटात ते वावरत असतात. त्यामुळे कॉंग्रेस भवनात कोणत्याही घटनेचा फोटो काढण्यास वर्तमानपत्रातील छायाचित्रकारही तयार नसतात. ही बाब छोटी असली तरी याच भूमिकेमुळे एकनिष्ठ कार्यकर्ता कॉंग्रेसपासून दूरावत चालला आहे. श्रेष्ठींनी याची गंभीर दखल घेणे आवश्‍यक आहे. या प्रकाराबाबत आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनीही वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. 

या ठराविक चेहऱ्यांचे वर्चस्व इतके की, फक्त जयंती किंवा पुण्यतिथी असलेल्यांचा फोटो बदलला की बस, जुना फोटोही वापरता येतो अशी स्थिती आहे. या कार्यक्रमाला कॉंग्रेसकडे आकर्षित झालेले युवा कार्यकर्तेही मोठ्या संख्येने भवनात येत आहेत. मात्र, त्यांना संधी दिलीच जात नाही, त्यामुळे हिरमुसले चेहरे घेऊन ते एका कोपऱ्यात उभारतात. मग पुुन्हा कॉंग्रेस भवनकडे फिरकतही नाहीत. या अनुभवामुळेच कॉंग्रेस भवनात येणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा कार्यक्रम असेल तेव्हा कॉंग्रेस भवन भरलेले असते, मात्र ते कार्यकर्ते शिंदे यांच्या प्रेमापोटी आलेले असतात. अशावेळीही "हे' चेहरे पुढे-पुढे करून नव्या लोकांना श्री. शिंदे यांना भेटू देत नाहीत. एखाद्या कार्यकर्त्याने भेटण्याचा प्रयत्न केला, तर संधी साधून त्यांना "फार पुढे चाललात का, आमच्यासमोर हे चालणार नाही', असा धमकीवजा इशारा देतात. त्यामुळे आपण भले, आपले घर भले, चुलीत गेला कॉंग्रेस अशी भावना डिवचल्या गेलेल्या युवांत निर्माण होऊ लागली आहे. या सर्व घडामोडींचीच प्रचिती ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आली. 

...तर निवडणुकीत बसेल धक्का 
"फोटोछाप' पदाधिकाऱ्यांना वेळीच आवरले नाही तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. नव्यांना संधी मिळालीच पाहिजे असे स्पष्ट धोरण विद्यमान शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी ठेवणे आवश्‍यक आहे. तशा सूचना विविध आघाडींच्या फोटोछाप पदाधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे.

Web Title: Congress crisis due to Shining Party Workers