सोलापुरात काँग्रेसची अग्निपरीक्षा 

Congress
Congress

सोलापूर : लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित झाली आहे. गत निवडणुकीतील अनुभव पाहता यंदा सोलापुरातून पुन्हा कॉंग्रेसचा उमेदवार विजयी करण्यासाठी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अग्निपरीक्षेतून जावे लागणार आहे. 

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षात इच्छुकांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत, काही ठिकाणी नावेही निश्‍चित झाली आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेस समितीने सुशीलकुमार शिंदे यांच्या एकाच नावाची शिफारस केल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मात्र, गतवेळी दूध पोळल्याने आता ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. 

गत निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघात श्री. शिंदे यांची पीछेहाट झाली. सोलापूर शहर उत्तरमध्ये सर्वाधिक धक्का बसला. तब्बल 50 हजारपेक्षा जास्त मताधिक्‍य भाजपचे उमेदवार ऍड. शरद बनसोडे यांना मिळाले होते. हीच स्थिती काही प्रमाणात शहर मध्य, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि पंढरपूरमध्ये होती. त्यामुळे आता प्रत्येक पाऊल फार सावधगिरीने उचलावे लागणार आहे. 

या मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून श्री. शिंदे यांचेच नाव असले तरी भाजपकडून मात्र तीन-चार नावे चर्चेत आहेत. त्यात विद्यमान खासदार ऍड. शरद बनसोडे, पिंपरी-चिंचवड येथील राज्यसभेचे खासदार अमर साबळे आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हेही आता स्पर्धेत उतरले आहेत. श्री. साबळे यांना उमेदवारी नाही मिळाली तरी काही परिणाम होणार नाही. मात्र, ऍड. बनसोडे यांना डावलून इतरांना संधी दिली गेल्यास ऍड. बनसोडे समर्थकांकडून बंडाचे निशाण फडकाविले जाऊ शकते. त्याचा फायदा कसा उचलायचा याचे धोरण कॉंग्रेसला निश्‍चित करावे लागणार आहे. प्रतिस्पर्ध्याला किरकोळ समजण्याची गतवेळेस झालेली चूक यंदाही महागात पडू शकते याची जाणीव सामान्य कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत असणे आवश्‍यक आहे. 

सोलापूर मतदारसंघातील संभाव्य उमेदवार 
सुशीलकुमार शिंदे (कॉंग्रेस), ऍड. शरद बनसोडे, अमर साबळे, प्रा. लक्ष्मण ढोबळेंपैकी एक (भाजप), ऍड. प्रकाश आंबेडकर (बहुजन वंचित आघाडी), राजाभाऊ सरवदे (रिपाइं-आठवले गट), ऍड. संजीव सदाफुले (बसप). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com