राष्ट्रवादी-भाजपची गट्टी, कॉंग्रेस एकाकी

राष्ट्रवादी-भाजपची गट्टी, कॉंग्रेस एकाकी

वडूज ः नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी व भाजपने पुन्हा गट्टी जमवून सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले, तर कॉंग्रेसकडून गल्लीपासून ते मंत्रालयापर्यंत जोर लावला गेला. मात्र, तो निष्फळ ठरला. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीत "राष्ट्रवादी'ला अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्षपद मिळाले तर भाजपला बिनविरोध उपनगराध्यक्षपद मिळाले. 

नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सुनील गोडसे व अपक्ष नगरसेवक शहाजी गोडसे यांच्यात दुरंगी लढत झाली. त्यात सुनील गोडसे यांनी राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा शोभा माळी, सुनीता कुंभार, सुवर्णा चव्हाण, काजल वाघमारे या पाच हक्काच्या मतांसह अपक्ष माजी उपनगराध्यक्ष संदीप गोडसे, विपुल गोडसे तसेच भाजपच्या किशोरी पाटील, वचन शहा, अनिल माळी यांचे समर्थन मिळवून बहुमतासाठी दहा मतांचा जादुई आकडा गाठला. तर अपक्ष शहाजी गोडसे यांनी कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, मंगल काळे, शुभांगी जाधव, छाया पाटोळे, प्रदीप खुडे या पाच मतांसह अपक्ष नगरसेविका डॉ. नीता गोडसे अशा एकूण सात मतांचे समर्थन मिळविले.

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नगराध्यक्षपदासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. विशेषत: कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या तीन मतांसाठी "फिल्डिंग' लावली होती. कॉंग्रेसचे पाच, भाजपचे तीन व अपक्ष शहाजी गोडसे, डॉ. सौ. गोडसे असा दहा मतांचा बहुमताचा जादुई आकडा गाठण्याची गोळाबेरीज केली होती. शिवाय त्यासाठी मंत्री पाटील यांच्यासमोर माजी आमदार डॉ. येळगावकर यांच्याशी चर्चा देखील झाल्याची चर्चा होत होती. त्यामुळे नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी शहाजी गोडसे यांची वर्णी लागण्याचा मार्ग सुकर मानला जात होता. 

राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा शोभा माळी यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडीत कॉंग्रेसने बाजी मारली होती. त्यामुळे नगरपंचायतीत राष्ट्रवादी व भाजपची अपक्षांच्या पाठबळावर मजबूत स्थिती असतानाही त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली होती. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या नामुष्कीची परतफेड करण्याची राष्ट्रवादी व भाजप वाट पाहत होते. त्यामुळे नूतन नगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी व भाजपने आपली युती कायम ठेवण्याचा निर्धारच ठेवला होता. कॉंग्रेसकडून खासदार नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून मंत्री पाटील यांच्यापर्यंत नगराध्यक्षपद निवडीचा विषय पोचल्यानंतर भाजपनेही आपल्या हालचाली गतिमान केल्याचे जाणवते. त्यामुळे स्थानिक राजकीय परिस्थितीबाबत जितेंद्र पवार व इतर काही पदाधिकाऱ्यांनी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या माध्यमातून महसूलमंत्री श्री. पाटील यांच्याशी शिष्टाई केल्याची चर्चा आहे. शिवाय खासदार, आमदारांना रोखण्यात राष्ट्रवादी-भाजप युतीला यश आले आहे. 

"सकाळ' चा अंदाज ठरला खरा... 
येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीची "फिल्डिंग' गल्लीपासून ते मंत्रालयापर्यंत लागली होती. त्यामुळे कॉंग्रेसला रोखण्याचे आव्हान राष्ट्रवादी व भाजपपुढे होते. नगराध्यक्षपदाच्या निवडीत कॉंग्रेसला रोखण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपची युती होऊ शकते. शिवाय या निवडीत भाजपच्या नगरसेविका किशोरी पाटील यांना उपनगराध्यक्षपद दिले जावू शकते, निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे घडण्याचे संकेत "सकाळ' ने 28 मे रोजीच्या अंकातील राजकीय वार्तापत्रात दिले होते. त्या संकेतानुसार कॉंग्रेसला रोखत नगराध्यक्षपद निवडीसाठी राष्ट्रवादी व भाजपची युती झाली. शिवाय भाजपच्या पाटील यांना उपनगराध्यक्षपदही मिळाले. "सकाळ'ने वर्तविलेल्या अचूक अंदाजाचे राजकीय क्षेत्रातून कौतुक होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com