esakal | कडेगाव तालुक्‍यात कॉंग्रेसचा भाजपला व्हाईट वॉश
sakal

बोलून बातमी शोधा

Congress given whitewash to BJP in Kadegaon taluka

कडेगाव तालुक्‍यातील नऊ पैकी नऊ ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसने निर्विवादपणे वर्चस्व सिध्द केले.

कडेगाव तालुक्‍यात कॉंग्रेसचा भाजपला व्हाईट वॉश

sakal_logo
By
संतोष कणसे

कडेगाव (जि. सांगली ) : तालुक्‍यातील नऊ पैकी नऊ ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसने निर्विवादपणे वर्चस्व सिध्द केले. अशा रीतीने कॉंग्रेसने भाजपला व्हाईट वॉश दिला. आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवला. हा निकाल कॉंग्रेसला बळ देणारा, तर भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा आहे.

विधानसभेला भाजपचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी माघार घेतली, तर राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी विक्रमी मताधिक्‍क्‍याने विजय संपादन केला. त्यानंतर मिळाली ती राज्यमंत्रीपदाची संधी. त्यांची विजयी घोडदौड सुरुच आहे.

काही दिवसांपूर्वी पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांचाही मोठ्या मताधिक्‍याने विजय झाला. भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. कॉंग्रेस जोमात, तर भाजप बॅक फुटवर गेल्याचे चित्र आहे.

पदवीधर निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच येतगाव, ढाणेवाडी, कान्हरवाडी, कोतिज, शिवणी, रामापूर, अंबक, सोनकिरे, शिरसगाव या नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. 

फुल्ल फॉर्ममध्ये असलेले कॉंग्रेसचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी निर्विवादपणे यश मिळण्यासाठी चांगलीच मशागत केली. कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मॅरेथॉन बैठका घेत काहीही झाले तरी बाजी मारण्यासाठी त्यांना कामाला लावले. कार्यकर्तेही रिचार्ज झाल्याने कॉंग्रेसला विजय मिळाला. 

पदवीधर निवडणुकीत अपयश आले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत उट्टे काढायचेच असा निर्धार भाजपने केला होता. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनीही बैठका घेऊन जोर लावला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही ताकद लावली होती. परंतु एकाही गावात भाजपला सत्ता मिळवता आली नाही. यापूर्वी पाच ग्रामपंचायतींवर असलेली सत्ताही भाजपने गमावली. हा निकाल भाजपच्या जिव्हारी लागल्याचे चित्र आहे. भाजपला येथे पुन्हा "अच्छे दिन' पहायचे तर त्यांना आता आत्मचिंतनाची गरज आहे हे निश्‍चित. 

राष्ट्रवादीला नगण्य यश 

राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला तालुक्‍यातील नऊ ग्रामपंचायतींत यश मिळवता आले नाही. रामापूर येथे भाजप- राष्ट्रवादी आघाडीला तीन, तर सोनकिरे येथे राष्ट्रवादीला एकच जागा मिळाली. राष्ट्रवादीला मिळालेले यश नगण्य म्हणावे लागेल. राष्ट्रवादीवर आत्मचिंतना करण्याची वेळ आली आहे.

संपादन : युवराज यादव