कर्नाटकात कॉंग्रेसच सत्तेवर येईल - पवार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

सातारा - कर्नाटकात सत्तेत येण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार केला आहे. मात्र, कॉंग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी राज्यात चांगले काम केले आहे. त्यांनी गोरगरिबांपर्यंत शासनाच्या सर्व योजना राबवल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकी जनतेचा कॉंग्रेसकडे ओढा आहे. या ठिकाणी भाजपने कितीही प्रयत्न केले, तरी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, असा अंदाज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्‍त केला. 

सातारा - कर्नाटकात सत्तेत येण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार केला आहे. मात्र, कॉंग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी राज्यात चांगले काम केले आहे. त्यांनी गोरगरिबांपर्यंत शासनाच्या सर्व योजना राबवल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकी जनतेचा कॉंग्रेसकडे ओढा आहे. या ठिकाणी भाजपने कितीही प्रयत्न केले, तरी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, असा अंदाज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्‍त केला. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त श्री. पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार प्रभाकर घार्गे, विक्रमसिंह पाटणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सुधीर धुमाळ उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, ""कर्नाटक निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविले आहे. त्यांनी तेथील निवडणुकीचा पूर्ण आढावा घेतला आहे. या निवडणुकीत कर्नाटकमध्ये कॉंग्रेससाठी चांगली परिस्थिती आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे आक्रमक असून, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कर्नाटकी जनतेसाठी विविध योजना राबवल्या. जनतेचे प्रश्‍नही त्यांनी योग्यरित्या सोडविले आहेत. त्यामुळे तेथील बहुतांश जनता कॉंग्रेसच्या पाठीशी आहे.'' 

"इव्हीएम'चा फेरविचार व्हावा 
निवडणुकांमध्ये मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इव्हीएम मशिनबाबत आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. बहुतांश पाश्‍चिमात्य देशांमध्ये इव्हीएम मशिन योग्य नसल्याने मतदानाची पद्धत बदलली आहे. त्यामुळे आपल्याकडे इव्हीएम मशिनवर मतदान घेण्यासंदर्भात फेरविचार व्हावा, अशी अपेक्षा श्री. पवार यांनी व्यक्‍त केली. 

पटेलांनी निवडणूक लढवू नये 
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकत्रितपणे लढणार आहेत. त्यासाठी चर्चा सुरू असून, समस्या आल्यास वरिष्ठ पातळीवर सोडवण्यात येतील. भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेसची आघाडी असल्याने या ठिकाणी कोणता उमेदवार द्यायचा, याचे संपूर्ण अधिकार खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिले आहेत. त्यानुसार ते तेथील उमेदवारीचा निर्णय घेतील. खासदार पटेल यांची राज्यसभेची खासदारकीची पाच वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत: मतदारसंघात निवडणूक लढवू नये, अशा सूचना मी केल्या आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार रिंगणात असणार आहे. 

Web Title: Congress government will come to power in karnataka