विट्यात पाटीलच !; कॉंग्रेसचा गड कायम

Congress Logo
Congress Logo

विटा : विधानसभा निवडणुकीप्रमाणे वादळ उठवून विटा नगरपालिकेवर भगवा फडकावण्याचे आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न भुईसपाट करत कॉंग्रेस नेते सदाशिवराव पाटील यांनी एकहाती सत्ता अबाधित राखली. विटेकरांनी 24 पैकी तब्बल 22 जागांवर कॉंग्रेसला निवडून देत आणि सदाभाऊंच्या स्नुषा सौ. प्रतिभा पाटील यांना जवळपास पावणेपाच हजारांच्या मताधिक्‍याने नगराध्यक्ष करून "विट्यात पाटीलच' असा स्पष्ट कौल दिला.

सुवर्णनगरी विट्यावर वर्चस्वासाठी सदाशिवराव पाटील आणि अनिल बाबर यांच्यातील संघर्षाचे नवेनवे पट या नगरीने अनुभवले होते. त्यावेळी बाबर राष्ट्रवादीतून तर सदाशिवराव पाटील कॉंग्रेसमधून सत्तेत असायचे. दोन सत्ताधाऱ्यांचा हा संघर्ष असायचा. यावेळी परिस्थिती वेगळी होती. बाबर सत्ताधारी पक्षाचे आमदार, तर पाटील हे सत्तेत नसलेल्या कॉंग्रेसचे पराभूत माजी आमदार. या स्थितीचा परिणाम विटेकरांवर किती होतो, राज्यातील सत्तेचा फायदा घेत विट्यासाठी निधी खेचण्याचा बाबर यांचा वचननामा किती परिणामकारक ठरतो, याकडे लक्ष होते. परंतु, सदाशिवराव पाटील यांनी विटा शहराचा केलेला नियोजनबद्ध विकास लोकांच्या मतातून उमटताना दिसला. गेल्या काही दिवसातील पाटील कुटुंबीयांच्या या शहरासाठीच्या योगदानाची पोचपावती एकतर्फी निवडणुकीत दिसून आली.

विटा पालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार करून आमदार बाबर पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले होते. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे नियोजन लावले होते. नगराध्यक्षपदाच्या लढतीसाठी स्नुषा डॉ. शीतल बाबर आणि प्रभाग दोनमध्ये नगरसेवक पदासाठी मुलगा अमोल यांना मैदानात उतरवले. दुसरीकडे सदाशिवराव पाटील यांनी अत्यंत नियोजनबद्ध रचना केल्याचे दिसले. नगराध्यक्षपदासाठी सौ. प्रतिभा यांना मैदानात उतरवल्यानंतर वैभव पाटील यांनी स्वतः प्रचारयंत्रणा सांभाळत थेट निवडणुकीत उडी घेतली नाही. त्याचे दृश्‍य परिणाम निकालांतून दिसतात. अर्थात, बहुतांश प्रभागात शिवसेनेने चांगले आव्हान देण्याचा प्रयत्न केला. अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची निवडणूक उभी केली गेली.

युतीच्या प्रचारार्थ सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह आमदार अनिल बाबर, गोपीचंद पडळकर, सुहास बाबर यांनी सभा घेतल्या. पाटील यांच्या कारभारावर टीकेचे "बाण' सोडले. सभांना प्रतिसाद आणि मतदानाची वाढलेली टक्केवारी पाहता विटेकरांचा कौल काय, याकडे लक्ष लागले होते. परंतु, राजकारणात दोन अधिक दोन नसते, हेच पुन्हा सिद्ध झाले. सदाशिवराव पाटील यांनी गनिमी काव्याने विरोधकांना गाफील ठेवत अशोकराव गायकवाड, अनिल म. बाबर, ऍड. बाबासाहेब मुळीक यांच्यासह कोपरासभा घेतल्या. दुसरीकडे वैभव यांनी गल्ल्या पिंजून काढल्या. अत्यंत संयमाने ही निवडणूक हाताळत सर्व प्रचारयंत्रणा कार्यक्षमपणे राबवली. त्याचा परिपाक त्यांना सत्ता अबाधित ठेवण्यात झाला.

लढले, पण हरले
शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी त्यांनी लढत चांगली दिली, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अनेक ठिकाणी शंभर किंवा शंभरपेक्षा कमी मतांनी त्यांचा पराभव झाला. खानापूर तालुक्‍याच्या ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात अनिल बाबर यांचा प्रभाव कमी आहे, हे वास्तव मान्य करून या गटाने शहराकडेही लक्ष दिल्यास भविष्यात संधी काठावर असल्याचे या निकालाने अधोरेखित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com