'महाराष्ट्र-कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादीवर सडकून टीका
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पूरग्रस्तांना मदत केली अद्याप काँग्रेसने का केली नाही? या प्रश्‍नांवर पटोले म्हणाले, "राष्ट्रवादी कॉंग्रेस पूरग्रस्तांना मदत करताना लेबल लावून करत आहे. ते काय उपकार करत नाहीत. परंतू उपकार करत असल्याप्रमाणे भासवत आहेत. आम्हाला फोटो, प्रसिद्धी काही नको आहे. आज मुस्लिम समाजाने ईद साजरी न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्याला सॅल्यूट
आहे. अशा प्रकारे आदर्श घेण्याची गरज आहे.''

सांगली : राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाला पावसाबाबत सूचना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. मुख्य सचिवांना नोटीस देऊनही कसूर केली. आता महाराष्ट्र व कर्नाटकचे मुख्यमंत्री एकमेकाला दोष देत आहेत. या दोघांविरूद्ध 302 चे गुन्हे दाखल करावेत यासाठी याचिका दाखल करणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, "सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नऊ दिवस महापुराचे तांडव सुरू आहे. आभाळंच फाटलं आहे. शासन पातळीवरील यंत्रणा अपयशी ठरली आहे. हा केवळ राजकीय आरोप नसून वस्तुस्थिती आहे. अतिवृष्टीबाबत दोन तारखेपासून सातत्याने आपत्ती व्यवस्थापनला सूचना केल्या आहेत. तरीही त्यांनी मुद्दामहून दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश दौऱ्यावर होते.

पाच तारखेला राज्याच्या मुख्य सचिवांना आम्ही नोटीस देखील दिली. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तत्काळ कारवाई केली नाहीतर हायकोर्टात दाद मागता येते. 2005 च्या महापुरावेळी दिवंगत नेते पतंगराव कदम, आर.आर. पाटील यांनी अलमट्टी धरणातील पाणी साठ्याबाबत कर्नाटकला कळवून प्रसंगी ते फोडण्याचा इशारा दिला होता. आता महाराष्ट्र व कर्नाटकात भाजपाचेच सरकार आहे. तरीही दोन्ही मुख्यमंत्री एकमेकांना दोष देत आहेत. त्यामुळे याप्रकरणात दोघांवर 302 चे गुन्हे दाखल करावेत यासाठी याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.''

पटोले म्हणाले, "पूरग्रस्तांना मदतीसाठी अन्य जिल्ह्यातून मदत येत असताना "आरएसएस' ने स्वत:चे लेबल त्यावर लावून ते वाटप करण्याचा उद्योग केला आहे. पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी देखील ज्या भागातून मतदान मिळाले तेथे बोट प्रथम पाठवली गेली असल्याच्या तक्रारी ऐकण्यास येत आहेत. 2005 च्या महापुरात दुसऱ्या दिवशी मदत सुरू केली. तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस अद्याप निर्णय घेत नाहीत. त्यांचा डीएनए तपासण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजीराव पेशव्याप्रमाणेच त्यांचा कारभार सुरू आहे. सांगली-कोल्हापूरातील महापुरातील परिस्थिती हाताळण्यासाठी मिलिटरीकडे सर्व जबाबदारी द्यायला हवी होती. या संकटाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून अद्याप घोषित केले नाही. राष्ट्रीय आपत्ती घोषित केली तरच पूरग्रस्तांना न्याय मिळू शकतो.'' काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रदेश कॉंग्रेसचे संजय
वाघमोडे, सचिन तावरे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीवर सडकून टीका
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पूरग्रस्तांना मदत केली अद्याप काँग्रेसने का केली नाही? या प्रश्‍नांवर पटोले म्हणाले, "राष्ट्रवादी कॉंग्रेस पूरग्रस्तांना मदत करताना लेबल लावून करत आहे. ते काय उपकार करत नाहीत. परंतू उपकार करत असल्याप्रमाणे भासवत आहेत. आम्हाला फोटो, प्रसिद्धी काही नको आहे. आज मुस्लिम समाजाने ईद साजरी न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्याला सॅल्यूट
आहे. अशा प्रकारे आदर्श घेण्याची गरज आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Nana Patole criticize Maharashtra Karnataka CMs on flood issue