विधानसभेच्या तोंडावर सोलापूर जिल्हा कॉंग्रेसमुक्तीच्या मार्गावर

अशोक मुरुमकर
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

सोलापूर शहर मध्य, पंढरपूर-मंगळवेढा व अक्कलकोट या मतदारसंघात सध्या कॉंग्रेसचे आमदार आहेत. अपवाद वगळता हे आमदारही कॉंग्रेसमध्ये राहतील की, नाही याबाबत उलटसुलट चर्चा कानावर येत आहेत. कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून एकेकाळी वरिष्ठ नेत्यांकडे विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्त्यांच्या रांगा लागत होत्या. मात्र आता काळ बदलला आहे, याची सतत जाणीव नेत्यांना, कार्यकर्त्यांनाच काय विरोधकांनाही होत आहे.

सोलापूर : अवघ्या दोन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासह नव्याने राजकारणात पाय रोवू पाहणारी वंचित आघाडी अशा सर्वांच्या काही ना काही राजकीय हालचाली सुरू आहेत. पक्ष वाढीसाठी असतील, लोकांपर्यंत पोचण्याच्या असतील किंवा निवडणुकीच्या दृष्टीने आणखी काही... पण एकमेव कॉंग्रेस हा असा पक्ष आहे की, या पक्षाची काहीही हालचाल दिसून येत नाही. हा पक्ष राजकारणात आहे की नाही असे वाटावे इतपत या पक्षात शांतता दिसून येत आहे. सोलापूर शहर वगळता एक-दोन तालुके सोडले तर कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सर्वत्र गपगार दिसत आहेत...! 

सोलापूर शहर मध्य, पंढरपूर-मंगळवेढा व अक्कलकोट या मतदारसंघात सध्या कॉंग्रेसचे आमदार आहेत. अपवाद वगळता हे आमदारही कॉंग्रेसमध्ये राहतील की, नाही याबाबत उलटसुलट चर्चा कानावर येत आहेत. कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून एकेकाळी वरिष्ठ नेत्यांकडे विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्त्यांच्या रांगा लागत होत्या. मात्र आता काळ बदलला आहे, याची सतत जाणीव नेत्यांना, कार्यकर्त्यांनाच काय विरोधकांनाही होत आहे.

राज्यात पुन्हा सरकार यावे म्हणून भारतीय जनता पक्ष कामाला लागला आहे. शिवसेनाही जास्तीतजास्त जागा मिळाव्यात, पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून सरसावली आहे. त्यातच कॉंग्रेसमध्ये मात्र अजूनही शांतताच आहे. सद्यःस्थितीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार नाही असे चित्र आहे. मात्र, जर ते स्वतंत्र लढले तर कॉंग्रेसला तुल्यबळ उमेदवार तरी मिळतील का असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, करमाळा विधानसभा मतदारसंघात 2014 ला माजी आमदार जयवंतराव जगताप कॉंग्रेसचे उमेदवार होते. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी त्यांचे चिरंजीव शंभुराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जगताप यांनी अधिकृत भाजप प्रवेश केला नसला तरी त्यांच्या डिजिटल बॅनरवर मात्र "कमळ' लागले आहे. त्यामुळे ते कॉंग्रेसमध्ये आहेत की, नाहीत हे चित्र स्पष्ट नाही. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील आमदार भारत भालके हेही कॉंग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली असल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे ते येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार असतील का, यावर कोणीही ठामपणे काही सांगू शकत नाहीत...!

अक्कलकोट कॉंग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे यांची देखील भाजप प्रवेशाची चर्चा आहे. त्यामुळे ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतील याकडे लक्ष लागले आहे. बाकीच्या तालुक्‍यातही फार वेगळे चित्र नाही. अपवाद वगळता जिल्ह्यात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही मरगळ असल्याचे चित्र आहे. ही अशीच मरगळ राहिली तर येत्या विधानसभेत कॉंग्रेसमुक्त जिल्हा होण्याची चिन्हे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leaders in Solapur district enters another parties