साेलापूर : निवडणूकीपूर्वीच आघाडीसमोर आव्हान! 

अशोक मुरुमकर 
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यात कॉंग्रस व राष्ट्रवादी समोर शिवसेना व भाजपने आव्हान निर्माण केले आहे.

सोलापूर : विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यात कॉंग्रस व राष्ट्रवादी समोर शिवसेना व भाजपने आव्हान निर्माण केले आहे. लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीला रामराम ठोकत माजी उपमुख्यमंत्री विजसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजिव माजी खासदार रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि तिथून विस्कटत चाललेली घडी पक्षा नेतृत्वाला व्यवस्थीत बसवता आली नाही. विधानसभेच्या तोंडावर एकएक करत तगडे नेते भाजप व शिवसेनेत जात असल्याने (गेलेलेही) त्यांना टक्कर देण्यासाठी ताकदीचे उमेदवार आघाडी कशी देईल, हा खरा आता प्रश्‍न आहे. 

विधानसभा निवडणूकीत शिवसेना व भाजपची युती होईल की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. पण कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी जवळजवळ निश्‍चित आहे. नेत्यांच्या पक्षांतरामुळे शिवसेना व भाजपची ताकद जिल्ह्यात वाढली आहे. लोकसभा निवडणूकीत माजी खासदार रणजिंतसिह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तिथून राष्ट्रवादीला घरघर लागली. त्यात हक्काचा मतदारसंघ म्हणून पाहिला जाणारा माढा लोकसभा मतदारसंघ हातातून निसटला. मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही, असे लक्षात येताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बदलण्याचा आग्रह धरला. त्याकडे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने दुर्लक्ष केले. तेव्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली.

दरम्यान, पक्षाचा आदेश पाळत करमाळ्यातील शिंदे यांचे विरोधक बागल यांनी त्यांचे कामही केले. पुढे शिंदे यांनी विधानसभा लढवावी असे त्यांचे कार्यकर्ते म्हणू लागले. दरम्यान राष्ट्रवादीच्या करमाळ्यातील प्रमुख कार्यकर्त्या रश्‍मी बागल यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून किती प्रयत्न झाले माहिती नाही. पण त्यांनी हाततले "घड्याळ' काढून ठेवले.

दरम्यान, बार्शीतही दिलीप सोपल यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी सोडत शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. सोलापूरातील दिलीप माने यांनी शक्तीप्रदर्शन करत मुंबईत जाऊन "शिवबंधन' बांधले आहे. सांगोल्याचे दीपक साळुखे यांनीही राष्ट्रवादीच्या जिल्ह्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पुढची राजकीय भूमिका त्यांनी जाहीर केली नसली तरी राष्ट्रवादीला हा धक्का आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्यातून आघाडीला आणखी धक्के बसण्याची शक्‍यता आहे. यातून आघाडी कशी सावरणार हे पहावे लागणार आहे. 

पक्षांतरे थांबवता येऊ शकली असती? 
कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सध्या पक्षांतरे सुरु आहेत. यासाठी "इडी' आणि "सीबीआय'ची भिती दाखवली जात असल्याची चर्चा आहे. ते खरे किती आणि खोटे किती माहिती नाही. मात्र, त्याहीपेक्षा पक्ष नेतृत्वाने नेत्यांना विश्‍वासात घेऊन काय प्रयत्न केले हे महत्वाचे आहे. लोकसभेतील पराभव झाल्यानंतर ज्या आक्रमकतेनी आघाडीने विधानसभेच्या तयारीसाठी उतरायला हवे होते. पण तसे झाच्याचे दिसत नाही. सर्वांना एका छताखाली ठेवण्यासाठी एकत्रित बैठक घेऊन अडीअडचणी सोडवायला हव्या होत्या. याबरोबर "इडी' आणि सीबीआय या भितीने जात आहेत. त्यांनी खरोखरच गैरव्यहवार केले असतील अशी शंका असेल तर त्यांना पाठिशी न घालता आघाडीनेच चौकशी करायला लावणे आवश्‍यक होते, अशी चर्चा रंगू लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leadership in Solapur in trouble