निम्म्याहून अधिक बूथवर प्रणिती शिदेंना आघाडी 

Praniti Shinde
Praniti Shinde

सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील निम्म्याहून अधिक म्हणजे २८३ पैकी १९३ बूथवर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आघाडी मिळवली. "एमआयएम'चे फारुक शाब्दी आणि अपक्ष महेश कोठे आपापल्या पट्ट्यातील मतमोजणी सुरू झाल्यावर "सुपरस्टार' ठरले आणि त्यांनी "प्रथम' स्थान मिळवले. 11व्या फेरीनंतर मात्र शिंदे यांनी घेतलेली आघाडी कायम राहिली आणि या आघाडीने त्यांच्या विजयावरच शिक्कामोर्तब केले. 

पहिल्या फेरीत रामलाल चौक, मुरारजी पेठ परिसराची मोजणी झाली, तीत शिंदे यांना मताधिक्‍य मिळाले. दुसऱ्या फेरीपासून मुस्लिम बहूल मतदार असलेल्या बेगम पेठ, किडवाई चौक या परिसराची मोजणी झाली आणि श्री. शाब्दी प्रथम क्रमांकावर आले, तर कोठे दुसऱ्या क्रमांकावर. या फेऱ्यांवेळी शिंदे तिसऱ्या क्रमांकावर होत्या. अशोक चौक, शांती चौक व अक्कलकोट रस्ता या भागात कोठे यांना मताधिक्‍य अपेक्षित होते, मात्र त्या ठिकाणी शाब्दी यांनी बाजी मारली. त्यानंतर पूर्व विभागातील केंद्रांची मोजणी सुरू झाली आणि कोठे "प्रथम' क्रमांकवर आले. नवव्या फेरीपर्यंत शाब्दी दुसऱ्या, तर शिंदे तिसऱ्या क्रमांकावर होत्या. दहाव्या फेरीत कोठे "प्रथम' होते, तर शाब्दींचे मताधिक्‍य मोडून शिंदे दुसऱ्या क्रमांकावर आल्या. 

11 व्या फेरीची मोजणी सुरू झाली आणि निकालाचे स्वरूपच बदलले. पहिल्या क्रमांकावर असलेले कोठे थेट तिसऱ्या क्रमांकावर गेले, तर शाब्दी दुसऱ्या क्रमांकावर. 11 ते 21 फेऱ्यांमध्ये शिंदे यांनी आपली आघाडी कायम ठेवली. त्यामुळे विजयाचे दावेदार असलेल्या कोठे आणि शाब्दीच्या समर्थकांचा हिरमोड झाला आणि त्यांनी जल्लोष थांबवला. एकूणच मतदानाची आकडेवारी आणि परिसर पाहिला तर कोठे व शाब्दी यांचा प्रभाव असलेल्या भागात ते "प्रथम' राहिले, तर शिंदे निम्म्याहून अधिक ठिकाणी आघाडीवर राहिल्या. त्यांनी केलेल्या विकासकामांची पावतीच मतदारांनी दिल्याचे स्पष्ट झाले. 

आडम, माने यांचा धक्कादायक पराभव 
माजी आमदार नरसय्या आडम व दिलीप माने यांचा या मतदारसंघातून धक्कादायक पराभव झाला. उमेदवारी मिळवण्यात माने यांना यश मिळाले, पण मतदारांची मने जिंकण्यात ते अपयशी ठरले. प्रचारादरम्यान आडम यांनी केलेल्या भाषणांचा संदर्भ देत शिंदे यांनी भविष्यातील अडचणींचे संकेत दिले. त्यामुळे हक्काचे मतदारही मास्तरपासून दूर गेले. 2014 च्या निवडणुकीत त्यांना 13,904 मते होती, यंदा त्यात घट होऊन ती 10, 505 वर आली. माने यांना "दक्षिण"मध्ये काँग्रेसकडून उभारले असता 42,954 मते मिळाली, "मध्य'मध्ये शिवसेनेकडून उभारले असता 29,247 मते मिळाली. कोठे यांची बंडखोरी त्यांच्यासाठी मारक ठरली. या दोघांपैकी एकजण रिंगणात असता तर त्यास शिंदेंपेक्षा जास्त मते मिळाली असती हे निकालावरून स्पष्ट होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com