अधिक घट्ट होतेय काँग्रेसी आघाडीची वीण

सचिन देशमुख
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पाटण - भाजपला थोपवण्यासाठी राज्यात दोन्ही काँग्रेसने कंबर कसली आहे. सत्तेत असताना एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा सूर जुळू लागला आहे. त्यातूनच दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची वीण अधिक घट्ट होताना दिसत आहे. त्याचे चित्र माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या काल झालेल्या अमृतमहोत्सवी सत्कार कार्यक्रमात पाहायला मिळाले. 

पाटण - भाजपला थोपवण्यासाठी राज्यात दोन्ही काँग्रेसने कंबर कसली आहे. सत्तेत असताना एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा सूर जुळू लागला आहे. त्यातूनच दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची वीण अधिक घट्ट होताना दिसत आहे. त्याचे चित्र माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या काल झालेल्या अमृतमहोत्सवी सत्कार कार्यक्रमात पाहायला मिळाले. 

भाजपच्या गोटात दाखल झालेले नरेंद्र पाटील यांचे बंधू व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी पाटणकर यांच्यासाठी आणलेल्या पुष्पहारामध्ये श्री. पाटणकर व ज्येष्ठ नेते शरद पवार होते. मात्र, श्री. पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना या हारामध्ये घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ज्येष्ठ नेते पवार यांची क्षुल्लक वाटणारी ही कृती दोन्ही काँग्रेस जवळ आणणारी असल्याचे संकेत देणारी आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांसह राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडून पृथ्वीराज चव्हाण यांचा होणारा उल्लेख जिल्ह्यातील आघाडी बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे.

सत्तेत असताना दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमधील सख्य राज्याला परिचित आहे. त्यात माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या कारभारावर तत्कालीन विरोधकांसह मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीकडून होणाऱ्या टीकाही सर्वांनी ऐकल्या आहेत. मात्र, २०१४ च्या निवडणुकीनंतर केंद्र व राज्यात भाजपने काबीज केलेल्या सत्तास्थानामुळे दोन्ही काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी देशपातळीपासून राज्यपातळीपर्यंत सर्वच विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. राज्यातही दोन्ही काँग्रेसने घटक पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यभर वातावरण निर्मितीसाठी दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे हल्लाबोल, परिवर्तन, जनसंघर्ष यात्रा काढल्या जात आहेत. मात्र, जिल्ह्यात प्रबळ विरोधक असणारे दोन्ही काँग्रेसला भाजपने आव्हान उभे करत प्रबळ पक्ष बनला आहे. त्यामुळे त्याला थोपवण्यासाठी दोन्ही काँग्रेस नेत्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या दोन्ही नेत्यांच्या आघाडीचा सूर जुळू लागल्याचे पाटणच्या कार्यक्रमातून दिसून येते. माजी मंत्री शशिकांत शिंदे, सत्कारमूर्ती विक्रमसिंह पाटणकर, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनीही पृथ्वीराज चव्हाणांचा आवर्जून केलेला उल्लेख महत्त्वाचा मानला जातो. त्याशिवाय आमदार जयंत पाटील यांनी त्यांच्या भाषणात भाजपवर टीकेची झोड उठवताना पृथ्वीराजबाबा त्यांच्या भाषणात राफेलवर बोलतील, असे सांगून त्यांच्या राफेलसंदर्भातील अभ्यासाला दाद दिली. या सर्व राजकीय घडामोडी दोन्ही काँग्रेसची आघाडी अधिक मजबूत करण्यास निश्‍चितपणे उपयुक्त ठरतील, हे नक्की.

Web Title: Congress NCP Aghadi Politics